नवी मुंबई : नेरुळ परिसरात सातत्याने गुन्हेगारी कृत्ये घडत असतानाही स्थानिक पोलिसांना त्यावर अंकुश लावण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. अशातच गुन्हे शाखा पोलिसांनी शिरवणे येथील लॉजवर चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर कारवाई करून सात मुलींची सुटका केली आहे. वरिष्ठांकडून "खा की" प्रवृत्तीची पाठराखण होत असल्याने नेरूळमध्ये गुन्हेगार मोकाट सुटल्याची टीका नागरिकांमध्ये होऊ लागली आहे.
शिरवणे येथील शुभोदया लॉजवर चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली आहे. सोमवारी रात्री त्याठिकाणी टाकलेल्या छाप्यात सात मुलींची सुटका करण्यात आली आहे. सदर ठिकाणी मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष तीन ला मिळाली होती. यावरून वरिष्ठ निरीक्षक पराग सोनवणे, सहायक निरीक्षक संतोष चव्हाण, उपनिरीक्षक आकाश पाटील, यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी लॉज मालक व दलाल यांच्यामार्फत तिथे चालणारा वेश्याव्यवसाय उघड झाला. याप्रकरणी रिंतुकुमार गौडा, संजितकुमार यादव, दलाल सचिन मंडल, अब्दुल्ला तरपदार व इतर काहींवर नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरवणे गाव परिसरात डान्सबार, लॉज यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालत आहेत. त्याविरोधात ग्रामस्थांनी अनेकदा आवाज उठवला आहे. मात्र पोलिसांकडून त्यांना दाद मिळत नसल्याने अवैध धंदेवाल्याचे फावताना दिसत आहे. परंतु वरिष्ठांकडूनच अवैध धंद्यात "मिली भगत" होत असल्याने सातत्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.