नेरूळच्या नाल्याचे काम संथ गतीने
By admin | Published: March 28, 2016 02:31 AM2016-03-28T02:31:18+5:302016-03-28T02:31:18+5:30
नेरूळ सेक्टर १३ ते १९ पर्यंतच्या नाल्याची सुधारणा करण्याचे काम पालिकेने फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरू केले. १० कोटी ६७ लाखांच्या कामाची मुदत महिन्यापूर्वीच संपली आहे.
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १३ ते १९ पर्यंतच्या नाल्याची सुधारणा करण्याचे काम पालिकेने फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरू केले. १० कोटी ६७ लाखांच्या कामाची मुदत महिन्यापूर्वीच संपली आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
शहरातील सर्वाधिक दुरवस्था झालेल्या नाल्यांमध्ये नेरूळ सेक्टर १३ ते १९ पर्यंतच्या नाल्याचा समावेश होतो. नाल्याच्या बाजूला रहिवासी संकुल असून तेथील नागरिकांना प्रचंड दुर्गंधीला सामोरे जावे लागत होते. यामुळे नगरसेवक रवींद्र इथापे यांनी या नाल्याची सुधारणा करण्यासाठी पाठपुरावा केला होता. पालिका निवडणुकीपूर्वी या नाल्याची सुधारणा करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. २० फेब्रुवारी २०१५ मध्ये प्रत्यक्षात कामाची सुरवात झाली. वर्षभरामध्ये काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदारास दिली होती. परंतु प्रत्यक्षात कामाला सुरवात पावसाळ्यानंतरच केली आहे. डिसेंबरपर्यंत अत्यंत धीम्या गतीने काम सुरू होते. कामाची मुदत संपत आल्यानंतर ठेकेदाराने वेगाने काम करण्यास सुरवात केली आहे. मुदत संपून एक महिना झाला तरी अद्याप पूर्ण काम झालेले नाही.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी काम पूर्ण होणे आवश्यक आहे. पावसात केलेले कामही फुकट जाण्याची शक्यता आहे. यामुळे ठेकेदाराने कामाचा वेग वाढविला आहे. पालिका नाल्याची सुधारणा करण्यासाठी तब्बल १० कोटी ६७ लाख रूपये खर्च करत आहे. एवढा खर्च करूनही काम वेळेत होत नसेल तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही नागरिक विचारू लागले आहेत. (प्रतिनिधी)
प्रशासनाचा निष्काळजीपणा : महापालिकेचा एकही प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही. पालिका मुख्यालय, वंडर्स पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ठाणे - बेलापूर रोड व इतर सर्व प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण झालेले नाही. यामुळे पालिकेला ठेकेदारास जादा पैसे द्यावे लागले आहेत. नेरूळमधील नाल्याच्या कामामध्येही वाढीव रक्कम द्यावी लागणार का, असा प्रश्नही विचारला जात असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या घटना होत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.