पनेवल परिसरात महामार्गावर CCTV कॅमे-याचे जाळे; वाहन चालकांवर 'वॉच'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 06:44 PM2022-08-27T18:44:18+5:302022-08-27T18:45:08+5:30
कळंबोली - गोवा महामार्गावर कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरुवात, सप्टेंबर महिन्यात यंत्रणा कार्यान्वित होणार
अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली - सायन - पनवेल एक्सप्रेसवर नियमांचे उल्लंघन करुन वाहने चालवणा-या वाहन चालकांना चाप लावण्यासाठी खारघर रेल्वे स्थानक समोरील ओव्हर ब्रिजवर सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तर कळंबोली - गोवा महामार्गावर चार सीसी टिव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही यंत्रणा कार्यान्वित होईल अशी अपेक्षा सिडकोच्या टेलीकॉम विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेला सुध्दा कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच गुन्हेगारीवर आळा घालण्यास सोपस्कार होणार आहे.
सायन - पनवेल महामार्गावरुन पुणे तसेच गोवा जाणा-या वाहनांचा संख्या मोठी आहे. अनेकदा वाहन चालकाकडून वेगमर्यादेचे आणि इतर नियमांचे पालन होत नाही.यामुळे हा महामार्ग दिवसेंनदिवस मृत्यूचा सापळा ठरत चालला आहे. त्याचबरोबर अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर सिडकोकडून २०१६ साली सायन पनवेल महामार्गावर दोन्ही लेनवर खारघर रेल्वे स्थानका समोरील ओव्हर ब्रिज येथे ६ सीसी टिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनांवर या यंत्रणेच्या माध्यमातून दंड ठोठावला जातो आहे.
तसेच मुंबई - गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षात पूर्ण झाले आहे. तेव्हा पासून या मार्गावरील वाहतूक जलद झाली आहे. या महामार्गावरुन जेनपीटीसाठी मार्ग जात असल्याने अवजड वाहतूकीची मोठी वर्दळ असते. अनेकदा अपघातही घडतात. त्याचा आढावा घेत कळंबोली ते टी पॉईंट दरम्यान दिशा दर्शक फलकावर दोन्ही लेनवर चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. ती लवकरच पूर्ण होऊन सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.
अत्याधुनिक कॅमेरा
खारघर रेल्वे स्थानक समोर महामार्गावरील दोन्ही लेनवर ६ कॅमेरे आहेत तर कळंबोली ते टी पॉईंट या महामार्गावरील दोन्ही लेनवर ४ सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. अत्याधुनिक स्वरुपाचे त्याचबरोबर अॅव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टीम कॅमेरे महामार्गावर बसवण्यात येत आहेत. ही कॅमेरे विप्रो कंपणीच्या माध्यमातून बसवले जात आहेत. तर बेलापूर सिडको टेलीकॉम येथून त्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
सिडकोचे वराती मागून घोडे
मुंबई - गोवा महामार्गाचे रुंदीकरण होऊन दोन वर्ष उलडून गेली तरी वातूकीला लगाम घालणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाही. मात्र मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर शिवसंग्राम पक्षाचे पक्ष प्रमुख विनायक मेटे त्यांच्या गाडीचा १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाचच्या सुमारास अपघात झाल्यानंतर महामार्गावरील असुरक्षीतता समोर आली आहे. यामुळे महामार्गावरील सुरक्षिततेसाठी सिडकोने आत्ता पाऊल उचलले आहे. वराती मागून घोडे अशीच गत सिडकोकडून करण्यात आल्याचे मत कळंबोली येथील माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी व्यक्त केली आहे.
काम करताना बत्ती गुल
सीसीटीव्ही कॅमेरे बसवताना महावितरणकडून येणारी विज जोडणी करण्यासाठी शनिवारी काम हाती घेण्यात आले होते. त्याच बरोबर कॅमेरे नेटवर्कची तपासणी करण्यात येणार आहे. मात्र तास - दोन तास लाईन येत नसल्याने कामाचा खोळंबा होत असल्याचे काम करणा-या कर्मचा-यांनी सांगितले.