वैभव गायकर, पनवेल : खारघरच्या दोन प्रवेशद्वारांपैकी एक असलेल्या कोपरा पूल परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न आणि या जीर्ण झालेला जुन्या पुलाला पर्याय म्हणून सिडको आणखी एक पूल बांधत आहे. सात मीटर रुंदीचा पूल पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा मानस आहे. त्यामुळे खारघरमधील रहिवाशांसाठी हा मोठा दिलासा मिळणार आहे.
खारघर-कोपरा येथील नैसर्गिक नाल्यावरील दोन अरुंद पुलांमुळे येथे वारंवार वाहतूककोंडी होते. एक पूल तर जीर्ण झाला असल्याने तो धोकादायक झाला आहे. त्यामुळे सिडको या ठिकाणी नवा पूल बांधत आहे. या कामाला देखील सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तो थेट शीव-पनवेल सागरी महामार्गाला जोडण्यात येणार आहे.
कोपरा पुलावर मोठा कायमस्वरूपी पूल नियोजित आहे. नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या अडथळ्यामुळे या ठिकाणच्या मोठ्या पुलाचे काम रखडले आहे.
सिडकोकडून तात्पुरता पर्याय -
१) या मार्गावर वाढत चाललेली कोंडी पाहता सिडकोने या पुलाच्या रूपाने तात्पुरता पर्याय काढला आहे.
२) मुंबईकडे जाण्यासाठी कोपरा पूल हा एकमेव पर्याय असल्याने वाहनचालकांना नाइलाजास्तव विरुद्ध दिशेने वाहन चालवावी लागत आहेत.
३) मुंबईकडे जाण्यासाठी देखील पर्यायी मार्ग सिडकोने तयार करण्याची गरज आहे.