पनवेल : मुख्य आयकर आयुक्त-२ ठाणे यांच्या अंतर्गत पनवेल येथील नवीन आयकर भवनचे लोकार्पण मुख्य आयकर आयुक्त पुणे विवेकानंद झा यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. नवीन पनवेल येथे उभारण्यात आलेल्या या प्रशस्त इमारतीतून संपूर्ण रायगड जिल्ह्याचे आयकरविषयक कामकाज चालणार आहे. हे आयकर भवन उभारण्यासाठी २९ कोटी रुपये खर्च आला आहे.सिडकोने २00९ मध्ये आयकर भवनसाठी ४ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड आयकर विभागाला दिला होता. भूखंड ताब्यात घेतल्यानंतर आयकर विभागाने त्यावर बांधकाम सुरू केले होते. २0१५ मध्ये आयकर भवनची चार मजली इमारत बांधून पूर्ण झाली. तसेच कर्मचाऱ्यांच्या निवासी इमारतीचे कामही प्रगतिपथावर आहे. या इमारतीत अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प, मेट्रो, शिवडी-न्हावा शेवा सीलिंक, जेएनपीटीचे चौथे बंदर आदीमुळे भविष्यात रायगड जिल्ह्याला वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे. या परिसरात लोकवस्तीसह उद्योगधंदे वाढीस लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन पनवेल येथे सुरू केलेले आयकर भवन उपयुक्त ठरणार आहे. आयकर भवनच्या लोकार्पण सोहळ्याला पुणे येथील आयकर विभागाचे अभय शंकर, ठाणे जिल्हा आयकर आयुक्त नित्यानंद मिश्रा, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, संजय पुंगलिया, असिफ करमाळी आदी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यासाठी पनवेलमध्ये नवीन आयकर भवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 1:43 AM