नवी मुंबई : नवी मुंबई शहरात डेटा सेंटर आणि आयटी पार्कची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, रबाले एमआयडीसीत सावली, घणसोली येथे ९०२३ कोटी ८८ लाख रुपयांची गुंतवणूक असलेले नवे आयटी पार्क उभे राहत आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या २१ व्या संमती समितीच्या बैठकीत या आयटी पार्कला हिरवा कंदील दिला आहे.
एमआयडीसीने त्यासाठी दिलेल्या भूखंडावर सपोर्ट प्रापर्टी प्रा. लिमिटेड ही कंपनी पहिल्या टप्प्यात २,५१,९३४.३० चौ. मीटर क्षेत्राच्या विस्तीर्ण भूखंडावर १, ११, ३४९.०२ चौरस मीटरचे बांधकाम करणार आहे. यासाठी कंपनी २५०१ काेटी १४ लाखांची गुंतवणूक करणार आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये मिळाली पर्यावरण मंजुरी
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने तर एकूण २,५१, ९३४.३० चौरस क्षेत्रावर हे ५,३७, २३३.९५ चौरस मीटर इतके विस्तीर्ण बांधकामास ११ डिसेंबर २०२३ रोजीच दाखला दिला आहे. त्यानंतर आता राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या २१ व्या बैठकीत संमती दिली आहे.याठिकाणी कंपनी एकूण ९०२३ कोटी ८८ लाख इतकी गुंतवणूक करणार आहे. या आयटी पार्कला पहिल्या टप्प्यात दररोज ३० लाख लीटर पाणी लागणार आहे. तर दररोज २९ लाख लीटर सांडपाणी निर्माण होणार असून, त्यावर प्रक्रियेसाठी १० सीएमडी क्षमतेचे एसटीपी बांधण्यात येणार आहे.
राज्याच्या आयटी पॉलिसीमुळे मिळतेय चालना
महाराष्ट्र शासनाच्या आपल्या २०२३ च्या आयटी पॉलिसीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग राज्यात यावेत यासाठी भरपूर सवलती दिल्या आहेत. त्यामुळे राज्यात पुणे, नवी मुंबईसारख्या शहरात आयटी पार्क आणि डेटा सेंटरचे मोठे जाळे उभे राहत आहे. या नवीन धोरणानुसार, आयटी कंपन्यांना महाराष्ट्र राज्यात कुठेही टेक पार्क स्थापन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. याव्यतिरिक्त त्यांना मुद्रांक शुल्कावर ५० ते १०० टक्क्यांपर्यंत भरीव सबसिडी मिळेल आणि १० ते १५ वर्षांच्या कालावधीसाठी वीज शुल्क माफ केले जाणार आहे. एमआयडीसीकडून आवश्यक पायाभूत सुविधा जसे की रस्ते, वीज, कनेक्टिव्हिटी आणि पाणी तसेच सर्व आवश्यक परवानग्या सुरक्षित करण्यासाठी, डेटा सेंटर पार्क उभारण्यासाठी आणि (ब) राज्य सरकार डेटा सेंटर पार्कच्या पायाभूत सुविधांशी संबंधित ट्रान्समिशन लाइन आणि सबस्टेशन टाकण्यात येणार असल्याने राज्यात आयटी पार्कचा ओढा वाढला आहे.
आयटी पार्कसाठी नवी मुंबईला सर्वाधिक पसंती
नवी मुंबईत यातील बहुतेक सुविधा आधीपासूनच असल्याने आयटी पार्क, डेटा सेंटरसाठी पोषक वातावरण आहे. ठाणे-बेलापूर रोड, सायन-पनवेल महामार्गासह ठाणे-वाशी रेल्वे मार्ग, मुंबई ते पनवेल-बेलापूर-वाशी रेल्वे मार्गामुळे कनेक्टिव्हिटीसाठी नवी मुंबई हे सर्वांत चांगले ठिकाण आहे. शिवाय मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबविली, पनवेल, उल्हासनगर-अंबरनाथ-बदलापूर ही शहरे नवी मुंबईपासून १० ते ३० किमीच्या परिघात आहेत. मुंबई विमानतळ, जेएनपीए, मुंबई पोर्ट ट्रस्ट ही बंदरेे प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी उपयुक्त आहेत.