नवी मुंबई - रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्याच्या वेशीवर २१५ एकरांवर नवी एकात्मिक औद्योगिक वसाहत उभी राहत आहे. राज्य प्रदूषण मंडळाच्या संमती समितीने येथे पायाभूत सुविधा उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे लवकरच या भागात पायाभूत सुविधांची कामे पूर्ण होऊन नवी औद्योगिक वसाहत कार्यन्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्या औद्योगिक वसाहतीत १६७० कोटी ४६ लाख रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
खासगीकरणातून ही एकात्मिक औद्योगिक वसाहत उभी करण्यात येत आहे. मायक्रोटेक डेव्हल्पर्स लिमिटेड ती उभी करीत आहे. अंबरनाथ उसाटणे आणि पनवेल तालुक्यातील नीतळस गावांच्या हद्दीत ती उभी राहणार आहे. एकाच छताखाली या एमआयडीसीत विविध उद्याेग उभे राहणार आहेत.याबाबतचा प्रस्ताव प्रथम ऑगस्ट २०२२ मध्ये मायक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडने राज्य प्रदूषण मंंडळाच्या संमती समितीसमोर सादर केला होता. त्यावेळी संमती समितीने काही शंका उपस्थित करून विकासकास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे ठरविले होते. यात पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक, पर्यावरणीय गुंतवणुकीत तफावत असणे, पर्यावरण मंजुरी नसणे, अशा शंका उपस्थित केल्या होत्या. त्यावर १२ डिसेंबर २०२२ रोजी आपले म्हणणे सादर केले. यात ही एकात्मिक औद्योगिक वसाहत असून, तिथे ते पायाभूत सुविधा पुरविणार आहेत. त्यासाठी ९३ कोटी ५१ लाख रुपये ते पहिल्या टप्प्यात खर्च करणार आहेत. येथे एकूण गुंतवणूक १६७० कोटी ४६ लाख रुपयांची असली तरी एकात्मिक औद्योगिक वसाहत असल्याने येणारे उद्योजक आपापली पर्यावरण परवानगी स्वतंत्र घेणार आहेत. कारण ते उद्योग विविध प्रकारचे राहणार आहेत. त्यामुळे विकासकास परत स्वतंत्र पर्यावरण परवानगी घेण्याची गरज नाही. या स्पष्टीकरणास प्रदूषण नियंत्रण मंडळाचे समाधान झाल्याने त्यांनी १८ जानेवारी २०२३ रोजीच्या आपल्या संमती समितीच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. या बैठकीचे इतिवृत्त २ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रसिद्ध केले आहेत.
९३.५१ कोटींच्या पायाभूत सुविधाप्रस्तावित वसाहत ८,६२,९०१ चौरस मीटर क्षेत्रावर उभी राहणार असून, तिथे ९,८५,३३६ चौरस मीटर बांधकाम केले जाणार आहे, तर विकासक पहिल्या टप्प्यात ९३ कोटी ५१ लाख खर्चाच्या पायाभूत सुविधा पुरविणार आहे.