नवी मुंबई : स्वच्छता ही सेवा मोहीम ११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबरदरम्यान देशभर प्रभावीपणे राबविली जाणार आहे. नवी मुंबईमध्येही हे अभियान नियोजनबद्ध राबविण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने केला असून महापालिका मुख्यालय प्लॅस्टिकमुक्त इमारत म्हणून घोषित करण्यात येणार आहे.महापालिका कार्यक्षेत्रामध्ये हे अभियान सुरू करण्यात आले आहे. ११ सप्टेंबरला ३ आर विषयक सोसायटी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. लोकसहभागातून प्लॅस्टिक प्रतिबंधात्मक मोहीम बेलापूर विभागात राबविण्यात आली. १३ सप्टेंबरला वाशी मिनी सी शोअर येथे अशाच मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे १४ सप्टेंबरला नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र . १0४ नेरूळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. १८ सप्टेंबरला नेरूळ येथे शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात महापौरांसह सर्व मान्यवर व शिक्षकांनी प्लॅस्टिक प्रतिबंधाची सामूहिक शपथ ग्रहण केली. या मोहिमेअंतर्गत प्लॅस्टिकमुक्त नवी मुंबई या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी व्यापक लोकसहभागाच्या अनुषंगाने सर्व स्तरांतील जनतेला सामावून घेत २ आॅक्टोबरपर्यंत राबवावयाच्या विविध कार्यक्र मांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. यामध्ये विशेषत्वाने देशातील आयकॉनिक इमारत म्हणून नावाजली जाणारी मुख्यालय इमारत ही प्लॅस्टिकमुक्त इमारत म्हणून घोषित करण्याचे नियोजन असून या इमारतीमध्ये प्लॅस्टिक प्रतिबंध करण्यात येणार आहे.स्वच्छ सर्वेक्षण २0१९ मध्ये महाराष्ट्र राज्यातील स्वच्छ शहराचे प्रथम क्र मांकाचे मानांकन कायम राखत नवी मुंबई महानगरपालिकेने २0१८ मधील देशात नवव्या क्र मांकाच्या मानांकनावरून दोन क्र मांक उंचावत सातव्या क्र मांकावर झेप घेतली. राज्य शासनामार्फत याकरिता महानगरपालिकेचा विशेष सन्मानही करण्यात आला. हे मानांकन उंचाविण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. यात सर्व शहर वासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.>स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत नियोजित कार्यक्रम पुढीलप्रकारे२0 सप्टेंबर रोजी विविध धार्मिक, पारमार्थिक संस्थांच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे.२१ व २२ सप्टेंबर रोजी सर्व विभागांमध्ये स्वच्छताविषयक मोहिमांचे आयोजन करण्यात येत आहे.२३ सप्टेंबर रोजी हॉटेल व्यावसायिकांची बैठक आयोजित करण्यात येत आहे.२४ सप्टेंबर रोजी महिला बचतगटांची कापडी पिशव्या वापरणेबाबत बैठक घेण्यात येत आहे.२५ सप्टेंबर रोजी सर्व खाजगी व महानगरपालिका शाळांमधील इयत्ता ६ वी ते दहावीमधील विद्यार्थ्यांच्या विभागवार जनजागृतीपर रॅली काढण्यात येणार आहेत.२७ सप्टेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्लॅस्टिक बंदीविषयी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.३0 सप्टेंबर रोजी आठही विभाग कार्यालय क्षेत्रात प्लॅस्टिक संकलन विषयी विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत.२ आॅक्टोबर रोजी स्वच्छ भारत अभियानास ५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर चला धावूया प्लॅस्टिकमुक्त नवी मुंबईसाठी हा संदेश प्रसारित करणारी स्वच्छता रन आयोजित करण्यात येत आहे.
नवी मुंबई महापालिका मुख्यालय प्लॅस्टिकमुक्त इमारत घोषित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:23 AM