घनकचरा व्यवस्थापनाचा नवी मुंबई पॅटर्न, कचºयातून खतनिर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 06:56 AM2018-01-05T06:56:20+5:302018-01-05T06:56:26+5:30
घनकचरा व्यवस्थापनाचा नवी मुंबई पॅटर्न राज्यभर पथदर्शी ठरू लागला आहे. कच-यातून खतनिर्मिती, फ्युएल पॅलेट्सची निर्मिती केली जात आहे. प्लॅस्टिकचाही पुनर्वापर सुरू आहे. वृक्षांच्या फांद्यांपासून गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून २५ किलोवॅट क्षमतेचा विद्युतनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. डेब्रिजपासूनही बांधकाम साहित्य तयार करण्यात येणार आहे.
नवी मुंबई - घनकचरा व्यवस्थापनाचा नवी मुंबई पॅटर्न राज्यभर पथदर्शी ठरू लागला आहे. कच-यातून खतनिर्मिती, फ्युएल पॅलेट्सची निर्मिती केली जात आहे. प्लॅस्टिकचाही पुनर्वापर सुरू आहे. वृक्षांच्या फांद्यांपासून गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून २५ किलोवॅट क्षमतेचा विद्युतनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. डेब्रिजपासूनही बांधकाम साहित्य तयार करण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयुक्त रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध उपक्रम व प्रकल्प राबविले जात आहेत. कचरामुक्त शहरासाठी घनकचºयाची अत्याधुनिक पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे. सद्यस्थितीमध्ये शहरातून ७०० मेट्रिक टन कचरा रोज संकलित होत आहे. कचरा निर्मितीच्या ठिकाणीच कचºयाचे वर्गीकरण करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. सद्यस्थितीमध्ये ८५ टक्के कचºयाचे वर्गीकरण होत आहे. ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी व्यापक जनजागृती सुरू केली आहे. रामनगरसारख्या झोपडपट्टी परिसरामध्ये कचºयाचे वर्गीकरण ९० टक्क्यापर्यंत पोहचले आहे. तुर्भे डम्पिंग ग्राउंडवर कचºयातून खतनिर्मिती होत आहे. कचºयापासून प्लॅस्टिक ग्रॅन्युल्स व उद्योग समूहांमध्ये बॉयलरमध्ये इंधन म्हणून वापर केला जात आहे. फ्युएल पॅलेट्सची निर्मिती केली जात असून उरलेला कचराच प्रत्यक्ष डम्पिंग ग्राउंडवर टाकला जात आहे. डम्पिंग ग्राउंडमधून निर्माण झालेल्या कचºयाचा वापर शहरातील २०० उद्यानांमध्ये केला जात आहे. याशिवाय पालघर, ठाणे, डहाणू, वसई, शहापूर, रायगड जिल्ह्यातील माणगाव, पेणपासून पुणे जिल्ह्यातील तळेगावपर्यंत शेतकरी हे खत घेवून जात आहेत.
महापालिकेने शहरातील मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी सोसायटी आवारामध्येच कचºयावर प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले. पालिकेने याची सुरवात स्वत:पासून केली आहे. सर्व उद्यान व महापालिकेच्या शाळांमध्ये कचºयावर प्रक्रिया केली जात आहे. शहरातील कचºयातून प्लॅस्टिक वेगळे केले जात आहे. हलके प्लॅस्टिक धुवून त्याचे लहान तुकडे केले जात आहेत. ते वितळवून त्याची बारीक पावडर अर्थात अॅग्लो तयार केली जात आहे. टाकाऊ प्लॅस्टिकपासून ग्रॅन्युल्स बनवून डांबरी रोड तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. शहरातील दहा रोड बनविण्यासाठी त्याचा वापर केला आहे. डम्पिंग ग्राउंडवर सनियंत्रित हवा गुणवत्ता केंद्र स्थापित करण्यात आले आहे. त्यामुळे हवेतील सर्व घटकांचे प्रमाण नियमित तपासणे शक्य होत आहे. महापालिकेने खतनिर्मितीनंतर आता वृक्षांच्या फांद्यांपासून गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाने दररोज २५ किलोवॅट क्षमतेचा विद्युतनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. याशिवाय डेब्रिजपासून बांधकाम साहित्य बनविण्यात येणार आहे.
अशी होते प्रक्रिया
पालिकेने २०१२ पासून तुर्भेमध्ये कचºयातून खतनिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. ओला व सुका कचरा वेगळा करण्यात येतो. ओल्या कचºयाचे ढीग तयार करून त्याचे विंड्रोज तयार करून त्यावर बायोकल्चर फवारले जाते. सात दिवसांनी ते ढीग घुसळून त्याचे नव्याने ढीग तयार केले जातात. चार वेळा कचरा हलवून ढीग केल्यानंतर २८ दिवसांनी त्याचे खत तयार केले जाते. खतायोग्य कचरा ३४ मिमी, १४ मिमी व ४ मिमीच्या चाळण्यांमधून चाळला जातो.
असा होतो कचºयाचा वापर
पालिकेच्या खतनिर्मिती प्रकल्पातून तयार केलेल्या खताचा वापर शहरातील २०० उद्यानांमध्ये केला जात आहे. याशिवाय डहाणू, वसई, शहापूर, माणगाव, पेण, तळेगाव परिसरातील शेतकरी खत घेवून जात आहेत. शेतकºयांकडून चांगली मागणी होत आहे.
विधानसभा अध्यक्षांनी केले कौतुक
पालिकेच्या घनकचरा प्रकल्पाला देश-विदेशातील शिष्टमंडळ भेट देत आहेत. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रकल्पाची पाहणी करून प्रकल्पाचे कौतुक केले. औरंगाबाद महानगरपालिकेच्या महापौर व पदाधिकाºयांनी या प्रकल्पास भेट देवून माहिती घेतली आहे. इतरही अनेक महापालिकांनीही प्रकल्पाची पाहणी केली आहे.
पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्वाचे पैलू
शहरातील ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे प्रमाण ८५ टक्के
रामनगर झोपडपट्टीमध्ये कचरा प्रक्रिया करण्यामध्ये आघाडी
२०० उद्याने व सर्व शाळांमध्ये कचºयावर प्रक्रिया करण्यास सुरवात
तुर्भे डंपिंग ग्राउंडवर कचºयातून खतनिर्मिती सुरू
सुक्या कचºयापासून प्लॅस्टिक ग्रॅन्युल्स तयार करून त्याचा वापर बॉयलर उद्योगामध्ये इंधन म्हणून केला जात आहे
प्लॅस्टिकची पावडर तयार करून त्याचा पुनर्वापर
प्लॅस्टिकपासून ग्रॅन्युल्स बनवून त्याचा वापर डांबरी रोड बनविण्यासाठी सुरू
प्रक्रिया केलेल्या प्लॅस्टिक ग्रॅन्युल्सचा दहा रस्ते बनविण्यासाठी वापर
लिचेटवर प्रक्रिया करून त्या पाण्याचा डंपिंग ग्राउंडवर फवारण्यासाठी वापर
डंपिंग ग्राउंडवर हवा गुणवत्ता केंद्राची उभारणी
कचºयापासून २५ किलो वॅट विद्युतनिर्मिती प्रस्तावित
डेब्रिजपासून लवकरच बांधकाम साहित्य बनविण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार