आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईतील चमूचे सुयश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 03:32 AM2018-11-15T03:32:21+5:302018-11-15T03:32:41+5:30
ग्वाल्हेर येथे आयोजन : लेझीम नृत्य सादर करून मिळाली वाहवा
नवी मुंबई : ग्वाल्हेर येथे नुकत्याच पार पडलेल्या १५व्या आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईच्या जालनावाला कलानिकेतनच्या चमूने शास्त्रीय नृत्य गटात द्वितीय पारितोषिक पटकावले. कलानिकेतनच्या संचालिका अनुराधा जालनावाला यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच या नृत्य महोत्सवात सहभागी झालेले नवी मुंबईतील विद्यार्थी प्रसन्न आचार्य, रीतिका शेट्टी, प्रथा पांडे, ओजस्विता पालकर, स्नेहा रेड्डी, तमन्ना भरत आणि श्राव्या शेट्टी यांनी भरतनाट्यम् शैलीत गणेश कृती आणि तिल्लाना नृत्य सादर केले.
महोत्सवात श्रीलंका, बल्गेरिया आणि टर्की या देशांसह भारतातून भोपाळ, इंदूर, हिस्सार, गुडगाव, ग्वाल्हेर, रायपूर, लखनऊ, नागपूर, औरंगाबाद, चेन्नई, बंगळुरू येथील नृत्य चमूंनी सहभाग घेतला होता. या महोत्सवातील विजेत्यांना परदेशात आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात आमंत्रित करण्यात आल्याची माहिती अनुराधा जालनावाला यांनी दिली. या महोत्सवाच्या निमित्ताने ग्वाल्हेर शहरात पहिल्या दिवशी काढण्यात आलेल्या स्वागत रॅलीमध्ये महाष्ट्रीयन पोशाखात दाखल झालेल्या जालनावाला कलानिकेतनच्या चमूने लेझीम नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.