नवी मुंबईकरांना घेता येणार मोकळा श्वास

By योगेश पिंगळे | Published: February 20, 2024 08:52 PM2024-02-20T20:52:41+5:302024-02-20T20:53:01+5:30

प्रदूषण रोखण्यासह साफसफाईकरिता ७ नव्या विद्युत यांत्रिकी मशिन घेणार.

New Mumbaikars can breathe freely | नवी मुंबईकरांना घेता येणार मोकळा श्वास

नवी मुंबईकरांना घेता येणार मोकळा श्वास

नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात सद्य:स्थितीत २ हजार ६४६ सफाई कामगारांमार्फत शहरातील रस्त्यांची पारंपरिक पद्धतीने दैनंदिन साफसफाई करण्यात येते. त्यामुळे हवेतील धूलिकणांच्या प्रमाणात वाढ होते. सक्शन मशिनने साफसफाई करताना हवेत पसरणाऱ्या धूलिकणांस सक्शनद्वारे अटकाव करणे शक्य आहे. त्यामुळे सदर ठिकाणांची यांत्रिकी पद्धतीने योग्यप्रकारे सफाई करण्याकरिता नव्याने ०७ नवीन (२ डिझेल, ४ सीएनजी व १ इलेक्ट्रिकल) स्वीपिंग मशिन खरेदीसाठी कार्यादेश दिलेले आहेत. यामुळे नवी मुंबईकर मोकळा श्वास घेता येणार असल्याचा विश्वास आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अर्थसंकल्प सादर करतेवेळी व्यक्त केला.

या मशिन २०२४-२५ या वर्षात कार्यान्वित होतील व त्याद्वारे वर्षामध्ये साधारणतः १ लाख २ हजार किलोमीटर रस्त्याची साफसफाई करणे शक्य होणार आहे.

बॅटरीवरील १२ हॉपर कॅपिसिटी स्वीपिंग मशिन
नवी मुंबई शहरातील अरुंद रस्ते, फुटपाथ, पार्किंग एरिया, बस स्टॅण्ड, उद्याने आदी ठिकाणी स्वीपिंग मशिन आकाराने मोठ्या असल्याने त्यांचा वापर करणे शक्य होत नाही. त्यामुळे सदर ठिकाणांची यांत्रिक पद्धतीने योग्यप्रकारे सफाई करण्याकरिता १२ बॅटरी ऑपरेटेड लिटर हॉपर कॅपिसिटी स्वीपिंग मशिन खरेदी करण्यात येणार आहेत.

फॉग कॅनॉन मिस्ट मशिन
हवेतील धूलिकण प्रदूषण कमी करण्याकरिता फॉग कॅनॉन मिस्ट मशिनद्वारे हवेतील धूलिकण जमिनीवर बसतील अशाप्रकारे हवेत पाण्याची फवारणी करून प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हवेतील गुणवत्ता वाढविण्यासाठी तीन फॉग कॅनॉन मिस्ट मशिन खरेदी करण्यात येणार असून याद्वारे मुख्य रस्ते धुण्याचे काम करण्यात येणार आहे.

८ चौकांत एअर प्युरिफायर
गर्दीच्या चौकामध्ये ८ ठिकाणी एयर प्युरिफायर व ०८ ठिकाणी स्टॅटिक फॉगिंग डस्ट सुपरेशन सिस्टिम बसविणे प्रस्तावित असून त्यामुळे धुळीचे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत रस्ते साफसफाईकरिता विद्युत यांत्रिकी सफाई मशिन घेण्यात येत आहेत. यामुळे शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

Web Title: New Mumbaikars can breathe freely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.