महापालिका नवीन; समस्या जुन्याच
By admin | Published: May 3, 2017 06:07 AM2017-05-03T06:07:27+5:302017-05-03T06:07:27+5:30
पनवेल शहर आणि बाजूचा विचार केला तर चार प्रभागांची निर्मिती करण्यात आलेली आहे. हा परिसर पूर्वी पनवेल नगरपालिका
अरुणकुमार मेहत्रे / कळंबोली
पनवेल शहर आणि बाजूचा विचार केला तर चार प्रभागांची निर्मिती करण्यात आलेली आहे. हा परिसर पूर्वी पनवेल नगरपालिका हद्दीत येत होता. त्यामुळे पाणी, वीज, गटार, अंतर्गत रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. याशिवाय पार्किंगची समस्या गंभीर बनलेली आहे त्यामुळे महापालिका नवीन; परंतु समस्या त्याच अशी स्थिती या प्रभागांमध्ये आहे.
पनवेल शहरात १८ आणि १९ हे दोन प्रभाग येतात. त्याचबरोबर १४ आणि २०मध्ये पनवेल शहराचा बराचसा भाग आहे. त्यामुळे एकूण चार प्रभागांवर पनवेल शहराचा प्रभाव आहे. गाढी नदीच्या पलीकडील भाग वगळता इतर भाग हा पनवेल नगरपालिका क्षेत्रात येत होता. प्रभाग १८ आणि १९चा विचार केल्यास पनवेल येथे आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
व्यापारी पेठांच्या शहरात रस्ते अरुंद आहेत. चालण्यासाठी पदपथांचा अभाव आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना बाजारपेठेत नाहीत. फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाबाबत फारशा हालचाली झालेल्या नाहीत. एनएमएमटी बससेवा सुरू झाली तरी अंतर्गत प्रवासाकरिता रिक्षांवर अवलंबून राहावे लागत आहे. मीटरप्रमाणे भाडे न आकारणे हा कळीचा मुद्दा कायम आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरू असले तरी कामात अनेक अडथळे येत आहेत. आजही अनेक अंतर्गत रस्त्यांची अवस्था चांगली नाही.
भुयारी गटार योजना राबविण्यात आली आहे; परंतु ते करीत असताना अनेक तांत्रिक बाबींचा विचार केला गेला नाही. पिण्याचा पाण्याचा प्रश्न दोन्ही प्रभागात आहे. मागणीपेक्षा कमी पाणीपुरवठा होत असल्याने दिवसाआड पाणी पनवेलकरांना दिले जाते.
सिडकोची क्षेपणभूमी बंद असल्याने शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आहे. दोन्ही प्रभागात बहुंताशी इमारतींमध्ये पार्किंग नसल्याने वाहने रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळे वाहतूककोंडीला निमंत्रण दिले जाते. सार्वजनिक पार्किंगचा अभाव असल्याने हा प्रश्न अतिशय गंभीर आहे.
बाजारपेठेत मालाची ने-आण करण्यासाठी येणाऱ्या मोठ्या वाहनांमुळे कोंडी निर्माण होते. अनियमित वीजपुरवठा ही समस्या नित्याचीच बनली आहे. अंतर्गत वीजवाहिन्या टाकण्याचा प्रश्न प्रलंबितच आहे.
प्रभाग क्र मांक-१४ समस्यांचे आगार
पनवेल शहरातील बावन बंगला, किनारा सोसायटी, साईनगर, मुस्लीम मोहल्ले, धाकटा आणि मोठा खांदा व खांदा वसाहतीतील एक सेक्टर हा परिसर प्रभाग चौदामध्ये येतो. बावन बंगला परिसर सखल असल्याने येथे पावसाचे पाणी शिरते, रस्त्यांची स्थिती फारशी चांगली नाही. मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. दोनही खांदा गावातसुद्धा आरोग्यापासून विविध सुविधांचा अभाव आहे.
प्रभाग-२०मध्ये अनेक प्रश्न
पोदीचा काही भाग आणि तक्का तसेच काळुंद्रे गावाचा या प्रभागात समावेश आहे. ग्रामपंचायत हद्द या प्रभागात आली असल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच, घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्याची विल्हेवाट हे मुद्दे ऐरणीवर आहेत.