विमानतळबाधितांसाठी नवे पर्याय
By admin | Published: August 26, 2015 10:56 PM2015-08-26T22:56:36+5:302015-08-26T22:56:36+5:30
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांना पुष्पकनगर येथे भूखंडांचे वाटप करण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्तांनी प्राप्त झालेल्या या भूखंडांची विक्री न करता त्याचा स्वत:च विकास
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांना पुष्पकनगर येथे भूखंडांचे वाटप करण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्तांनी प्राप्त झालेल्या या भूखंडांची विक्री न करता त्याचा स्वत:च विकास करावा, अशी सिडकोची भूमिका आहे. त्यासाठी गुंतवणुकीचे कोणकोणते पर्याय आहेत, याची माहिती प्रकल्पग्रस्तांना मिळावी, या दृष्टीने सिडकोने नामवंत बँकांच्या समन्वयाने एका विशेष मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन केले आहे. २८ आॅगस्ट रोजी वाशी येथील सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात सकाळी १०.३० ते संध्याकाळी ४.३० या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.
राज्य सरकारने विमानतळ प्रकल्पबाधितांसाठी जाहीर केलेल्या २२.५ विकसित भूखंडाचे धोरण आणि पुनर्वसन व पुन:स्थापन पॅकेजनुसार सिडकोतर्फे प्रकल्पबाधितांना भूखंडाचे वाटप करण्यात येत आहे. अशा भूखंडावर निवासी व व्यावसायिक संकुले विकसित करण्यासाठी विविध विकासक आकर्षित होत आहेत. परंतु यापूर्वी १२.५ टक्के योजनेंतर्गत वाटप करण्यात आलेल्या भूखंडाबाबत ज्या घटना घडल्या त्यांची पुनरावृत्ती होवू नये, विमानतळबाधितांनी स्वत:च विकासक बनून आपल्या भूखंडाचा विकास करावा, त्या दृष्टीने सिडको प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेत सिडकोतर्फे पुनर्वसन व पुन:स्थापन, नियोजन, बांधकाम परवानगी आणि वसाहत विभागातर्फे भूखंड विकासासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या व मान्यता कशाप्रकारे मिळवाव्यात याविषयी विस्तृत माहिती देणारे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच बँक आॅफ महाराष्ट्रतर्फे मोठे कर्ज प्रस्ताव, अॅक्सिस बँकतर्फे गृहकर्ज व कॅनरा बँकेतर्फे गुंतवणूक प्रतिनिधींकडून उपस्थितांचे शंका निरसन करण्यासाठी प्रश्नोत्तरे सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)