पनवेल: नवीन पनवेलमधील सिडको वसाहतीमध्ये मागील चार दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने येथील माजी नगरसेवकांनी सिडको कार्यालयालयात धडक देत अधिकाऱ्यांना घेराव घातला.
यावेळी सिडको अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात माजी महापौर डॉ कविता चौतमोल,माजी सभागृह नेते परेश ठाकूर,माजी नगरसेवक संतोष शेट्टी,माजी नगरसेवक समीर ठाकूर,माजी नगरसेवक राजेश्री वावेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चार चार दिवस पाणी येत नसल्याने रहिवाशांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. टँकर चालकांकडून देखील प्रति टँकर तब्बल 2200 रुपये आकारले जात असल्याने एका सोसायटीला दोन ते तीन टँकर लागत आहेत. यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी आहे.
नागरिकांचा उद्रेक पाहता लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत सिडको अधिकाऱ्यांचा यावेळी घेराव घालत त्यांना जाब विचारला. एमजेपीचा पंप बंद असल्याने शहरात पाण्याची समस्या उद्भवली आहे. याबाबत सिडको अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून ही समस्या मार्गी न लागल्यास पुढील आठवड्यात सिडकोविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती माजी नगरसेवक समीर ठाकूर यांनी दिली.