कळंबोली : पनवेल महानगरपालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. आता एक महिना सुध्दा उरलेला नाही, असे असताना अद्याप काही पक्षांचे उमेदवार ठरलेले नाहीत. मात्र शेतकरी कामगार पक्षाने नवीन पनवेल आणि खांदा वसाहतीत आपला प्रचार सुरू केला आहे. मतदारांच्या गाठीभेटींबरोबरच त्यांच्यापर्यंत परिचय पत्रक सुध्दा पोहचविण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्षाकडे जवळपास तीनशे जणांनी उमेदवारी मागितली आहे. त्याचबरोबर शिवसेनेबरोबर युती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाचे उमेदवार ठरलेले नाहीत. काही जणांचे तिकीट फिक्स असले तरी त्यांची उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर केलेली नाही. तीच अवस्था शिवसेनेची आहे. पक्षप्रमुखांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे आदेश दिले असतानाही काही स्थानिक नेते भाजपाबरोबर घरोबा करण्यासाठी या ना त्या मार्गाने प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे धनुष्यबाणाचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्षाबरोबर निवडणूक लढणार आहे. परंतु त्यांच्यामध्ये नेमका कोणाला किती आणि कोणत्या जागा याबाबत शिक्कामोर्तब झालेले नाही. काँग्रेस मोठा पक्ष असल्याने उमेदवारीबाबत प्रदेश कार्यालयातून ग्रीन सिग्नल घ्यावा लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील बहुतांशी इच्छुकांमधील पत्ता कट होण्याची शक्यता आहे. परंतु या सर्वात शेतकरी कामगार पक्षाने उजवे राजकारण सुरू केले आहे. त्यांची जवळपास बरेचशा उमेदवारांची नावे फायनल झाली आहेत. त्यामुळे ते उमेदवार आपल्या प्रभागात आता प्रचार करू लागले आहेत. विशेष करून खांदा वसाहतीत म्हणजे प्रभाग क्र मांक १५ मध्ये माजी नगरसेवक शिवाजी थोरवे, विजय काळे यांच्या मातोश्री कुसुम काळे आणि मोहन गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. परिचय पत्रक छापून ते डोअर टू डोअर मतदारांच्या भेटीला पाठविण्यात आलेली आहेत. दुसरीकडे या प्रभागात भाजपाचे उमेदवार ठरलेले नाहीत त्यामुळे शांतता आहे. परंतु पक्षांतर्गत तिकिटासाठी चुरस सुरू आहे. प्रभाग क्र मांक १७ मध्ये माजी नगराध्यक्ष संदीप पाटील आणि शिवानी घरत यांची प्रचारफेरी सुरू झालेली आहे. हे उमेदवार थेट मतदारांच्या भेटीला जात आहे. याच प्रभागात भाजपाकडून अॅड. मनोज भुजबळ यांना उमेदवारी मिळणार असल्याने त्यांनी इच्छुक म्हणून प्रचार सुरू केला आहे. (वार्ताहर)
नवीन पनवेल, खांदा वसाहतीत गाठीभेटींवर भर
By admin | Published: April 27, 2017 12:09 AM