नवीन पनवेलच्या सांडपाण्यावर प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 01:23 AM2019-06-06T01:23:43+5:302019-06-06T01:24:08+5:30
नवीन पनवेलची उभारणी करताना सिडकोने या ठिकाणी मलनि:सारणकेंद्राची निर्मिती केली नाही.
कळंबोली : नवीन पनवेल नोडमधील सांडपाणी प्रक्रिया न करताच ते पावसाळी नाल्यात सोडून दिले जाते. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचा त्रास होत आहे. या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी तक्रारी केल्यानंतर सिडकोने नवीन पनवेल आणि खांदा वसाहतीतील सांडपाण्यावर कामोठे येथील मलनि:सारण केंद्रात प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्या संबंधीची कार्यवाहीही सुरू करण्यात आली आहे. तसेच पावसाळी नाल्यात पाणी सोडणे बंद झाल्याने परिसरातील दुर्गंधीचा त्रासही कमी झाला आहे.
नवीन पनवेल आणि खांदा कॉलनीत या दोन नोडमध्ये एकूण ३३ सेक्टर्स आहेत. या विभागासाठी ४० एमएलडी पाण्याची गरज आहे. नवीन पनवेलची उभारणी करताना सिडकोने या ठिकाणी मलनि:सारणकेंद्राची निर्मिती केली नाही. सांडपाण्यासाठी नवीन पनवेल येथे दोन तर खांदा वसाहतीत एक पंपहाउस बांधण्यात आले आहे; परंतु हे पंपहाउस निरोपयोगी ठरले आहेत. या क्षेत्रातील सांडपाणी शेजारच्या पावसाळी नाल्यात सोडले जाते, यामुळे आसुडगाव तसेच कामोठे वसाहतीतील नाल्यालगत राहणाऱ्या रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना विधानसभा संघटक दीपक निकम यांनी सिडकोकडे वारंवार पाठपुरावा करून पावसाळी नाल्यात सोडले जाणारे सांडपाणी बंद करण्याची मागणी केली. त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण महामंडळकडे याबाबत तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे सिडकोने सर्व तांत्रिक अडथळे दूर करून आता हे सर्व सांडपाणी पम्पिंग करून कामोठे येथील मलनि:सारण केंद्रात त्यावर प्रक्रिया केली जात आहे. त्यानंतर प्रक्रिया केलेले हे पाणी खाडीत सोडले जाते.
मलमिश्रित आणि सांडपाणी कामोठे येथील मलनि:सारण केंद्राकडे प्रक्रि याकरिता पाठवले जात आहे. हे पाणी पावसाळी नाल्यात सोडले जात नाही. याअगोदरही पावसाच्या पाण्याचे प्रमाण जास्त होणे, त्यामुळे पंप ओव्हरफ्लो होणे, अशा अपवादात्मक परिस्थितीत सांडपाणी पावसाळी नाल्यात सोडले जात होते. मात्र, आता या पाण्यावर मलनि:सारण केंद्रात प्रक्रिया केली जात असल्याने हा प्रश्न निकाली निघाला आहे. - व्ही. एल. कांबळी, कार्यकारी अभियंता, सिडको,