होल्डिंग पाँडवर नवे सुरक्षारक्षक
By admin | Published: July 5, 2017 06:43 AM2017-07-05T06:43:15+5:302017-07-05T06:43:15+5:30
कळंबोली वसाहतीत पावसाळ्यात होल्डिंग पाँडवर गेल्या दहा वर्षांपासून २४ तास काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांना यंदा काम देण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : कळंबोली वसाहतीत पावसाळ्यात होल्डिंग पाँडवर गेल्या दहा वर्षांपासून २४ तास काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांना यंदा काम देण्यात आले नाही. संबंधित एजन्सीने या ठिकाणी नवीन सुरक्षारक्षक नेमले आहेत. केवळ एका नगरसेवकाच्या दबावापोटी हा बदल केला असल्याचा आरोप अनुभवी सुरक्षारक्षकांनी केला आहे. आम्ही सर्व जण स्थानिक आहोत आणि आपल्यावरील अन्यायावरील तक्रार त्यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे केली.
कळंबोली वसाहत समुद्रसपाटीपासून तीन मीटर खाली आहे. त्यामुळे सलग पाऊस पडला तर वसाहतीत पाणी भरते. २००५मध्ये २६ जुलै रोजी सर्वाधिक मनुष्य आणि वित्तहानी कळंबोलीत झाली होती. सिडकोने पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च करून चॅनेल काढले. त्याचबरोबर पाच ठिकाणी जलधारण तलाव म्हणजे होल्डिंग पाँड विकसित केले. पाँडला पावसाळी नाले जोडण्यात आले आहेत. पंपाद्वारे पाँडमधील पाणी उपासण्याची सुविधा आहे. एकंदर होल्डिंग पाँड हे कळंबोलीचे रक्षक आहेत. या ठिकाणी सिडकोकडून सुरुवातीला ५४ सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले होते. आता पाचही होल्डिंग पाँडच्या सुरक्षेची जबाबदारी २७ जणांवर आहे. चेंबरची तपासणी करणे, वेळप्रसंगी गेट उघडणे, बंद करणे, सिडकोच्या आपत्कालीन कक्षाला माहिती पुरविणे, अशी कामे सुरक्षारक्षक करतात. गेल्या दशकभरापासून काम करीत असल्याने त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. असे असताना हे काम मिळालेल्या एजन्सीने या जुन्या सुरक्षारक्षकांऐवजी नवीन सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत. वर्क आॅर्डरवर मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांची सही झालेली नाही, तरी नवीन सुरक्षारक्षकांना कामावर घेण्यात आले आहे. यंदा आम्हाला काम देण्यात आले नसल्याचे विलास पाटील या सुरक्षारक्षकाने सांगितले. मंगळवारी दुपारी रमेश बगाडे, विजय कुस्ते यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षारक्षकांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता सुनील कापसे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. एजन्सी आणि सुरक्षारक्षक नियुक्त करणे हे काम सुरक्षा विभाग करीत असल्याचे या वेळी कापसे यांनी सांगितले.
गावातील तरुण गेल्या अनेक वर्षांपासून हे काम करीत आहेत. त्यांना याबाबत इत्थंभूत माहिती आहे. वसाहतीत पुराची परिस्थिती निर्माण होऊ नये, याकरिता ते सतत अलर्ट असतात. आता नवीन सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आलेत, त्यांना याबाबत काहीच माहिती नाही. एका नगरसेवकाच्या सांगण्यानुसार हे बदल करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
- विजय कुस्ते, स्थानिक प्रकल्पग्रस्त, कळंबोली.