सिडको अग्निशमन दलात नवीन भरती
By Admin | Published: November 25, 2015 02:02 AM2015-11-25T02:02:09+5:302015-11-25T02:02:09+5:30
संपूर्ण वसाहतींच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या सिडको अग्निशमन दलातील तरूणांची कायमस्वरूपी भरती करण्यात आली आहे
कळंबोली: संपूर्ण वसाहतींच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या सिडको अग्निशमन दलातील तरूणांची कायमस्वरूपी भरती करण्यात आली आहे. त्यामुळे मनुष्यबळात वाढ झाली असून अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे. आगामी काळात त्यामध्ये आणखी वाढ करण्याचा मानस या दलाचा आहे. त्यामुळे वसाहतीत लागलेल्या आगीचा सामना सहज करता येणार आहे.
पनवेल परिसरात नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे, द्रोणागिरी या सिडको वसाहती आहेत. आता उलवे, तळोजा, नावडे, करंजाडे या ठिकाणी नवीन वसाहती उभारण्यात येत आहेत. या वसाहतीत टोलेजंग इमारती उभारण्यात येत आहेत. त्याचबरोबर सिडको नोडमध्ये वेगवेगळया वस्तुचे दुकाने, शोरूम, शाळा, महाविद्यालय, उपहारगृह रूग्णालयांची संख्या जास्त आहे. या व्यतिरिक्त बाजूला तळोजा, पाताळगंगा एमआयडीसी, ओएनसी, जेएनपीटी सारखे शासकीय उपक्र म आहेत. त्याचबरोबर पनवेल परिसरातून पनवेल-सायन द्रुतगती, मुंबई- पुणे, मुंबई- गोवा, मुंब्रा हे महत्वपूर्ण महामार्ग जातात. वाढते दळणवळण, औद्योगीक आणि नागरीकरणामुळे आग लागणे, अपघाताचे प्रमाण वाढत आहे. परिणामी सिडको अग्निशमन दलाच्या जवानाना सतत तत्पर राहावे लागते. कॉल आला की काही मिनिटात त्यांनी घटनास्थळी पोहचणे क्र मप्राप्त असते. ठाणे, रायगड जिल्ह्याच्या हद्दीत एखादी मोठी आगीची घटना घडली तर त्या ठिकाणीही सिडकोवाल्यांना मदतीसाठी जावे लागते.
नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, द्रोणागिरी या ठिकाणीच्या अग्निशमन केंद्रावर प्रचंड ताण असतो. असे असतानाही या ठिकाणी अतिशय कमी मनुष्यबळ होतो. त्यामध्ये कंत्राटी कामगारांची संख्या सर्वाधिक होती. म्हणजे एकूण ६ फायरमन कायमस्वरूपी होते. बाकी कंत्राटी कामगारांनीच इतकी वर्ष फायर फायटिंगचे काम केले. केंद्र अधिकारी ३, सहाय्यक अधिकारी ३,फायरमन ४३, लिडिंग फायरमन ८, वाहनचालक १६, असे एकूण ७३ इतकी संख्या होत आहे. ठिकाणी शर्थीचे प्रयत्न करून या कर्मचाऱ्यांनी जीवित आणि वित्तीय हानी टाळली आहे. ही संख्या उपलब्ध लोकसंख्येच्या तुलनेत कमी होती म्हणून सिडकोने २८ आॅगस्टला जाहीर प्रसिध्द करून रिक्त पद भरण्याकरीता अर्ज करण्याचे आवाहन उमेदवारांना केले. १३ सप्टेंबरला नवीन उमेदवारांची परीक्षा सुध्दा घेण्यात आली. त्यामध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची सिडकोने कायमस्वरूपी भरती केली आहे. एकूण चार अग्निशमन केंद्रात ६० जणांची नव्याने भरती करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहेच त्याचबरोबर चारही ठिकाणी विभागानी करण्यात आली आहे. (वार्ताहर)