नवी मुंबई : मुंबई, नवी मुंबईकरांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा करता यावा, यासाठी बाजार समितीमधील पाचही मार्केट सुरूच राहणार आहेत. भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी मार्केटची वेळ रात्री २ ते सकाळी १० ऐवजी रात्री १० ते सकाळी १० अशी करण्यात आली आहे. मार्केटमधील किरकोळ व्यापार बंद करण्यात आला असून, मोटारसायकल व कारना मार्केटमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे.बाजार समितीमध्ये सर्वाधिक गर्दी भाजीपाला मार्केटमध्ये होत असते. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता असल्यामुळे व्यापारी महासंघ व बाजार समिती प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. मार्केटमध्ये किरकोळ विक्री पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ग्राहकांना पालेभाज्यांची किमान एक गोण खरेदी करावी लागणार आहे. फळभाज्या किमान १० किलोपेक्षा जास्त खरेदी कराव्या लागणार आहेत. मार्केटमध्ये सायंकाळी सहा ते पहाटे पाचपर्यंत कृषी मालाची आवक सुरू राहणार आहे. रात्री १० ते सकाळी दहापर्यंत व्यापार करता येणार आहे. मार्केटमध्ये आलेली वाहने तीन तासात बाहेर गेली पाहिजेत. मोटारसायकल, कार या खासगी वाहनांना मार्केटमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. अडते, व्यापारी यांनी त्यांच्या गाळ्यामध्ये सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे.मार्केटमधील किरकोळ व्यापार बंद करण्यात आला असून, मोटारसायकल व कारना मार्केटमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. बाजार समितीमध्ये ४५ वर्षांवरील सर्वांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार रूपये दंड आकारण्यात येणार आहे. मार्केटमध्ये एकावेळी २००पेक्षा जास्त ग्राहकांना सोडले जाणार नाही. मार्केटमध्ये चार गेटच सुरू ठेवले जाणार असून, इतर बंद केली जाणार आहेत. मार्केटमध्ये प्रत्येक गाळ्यात व्यापारी व एक मदतनीस यांनाच थांबता येणार आहे. रोजंदारीवर काम करणारांचीही अँटिजेन चाचणी करण्यास सुरुवात केली आहे.बाजार समितीमध्ये आवक वाढलीलॉकडाऊनच्या शक्यतेमुळे भाजीपाला मार्केटमध्ये शनिवारी तब्बल ६९१ वाहनांची आवक झाली होती. सोमवारीही ६६१ वाहनांची आवक झाली आहे. आवक वाढल्यामुळे भाजीपाल्याचे दर १५ टक्केे कमी झाले आहेत. मंगळवारपासून नियंत्रित आवक सुरू राहील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार सुरळीत सुरू राहील. याकडे लक्ष देण्यात आले आहे. प्रत्येक मार्केटमध्ये सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असून, भाजी मार्केटसाठी विशेष नियमावली लागू केली आहे. - संदीप देशमुख, प्रभारी सचिव, एपीएमसीभाजी मार्केटसाठी नवीन नियमावली तयार केली असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत असून, मुंबई, नवी मुंबईकरांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा करण्यात येणार आहे. - शंकर पिंगळे, संचालक, भाजी मार्केट
भाजी मार्केटसाठी आता नवीन नियमावली!; बाजार समितीमध्ये सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 3:25 AM