उरण : खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मासळी मिळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. यामुळे मच्छीमारांनी मासळी पकडण्याच्या सर्च लाइट फिशिंग पद्धतीचा नवा फंडा शोधून काढला आहे. या नव्या पद्धतीत कमी वेळेत जास्त मासळी पकडणे शक्य होत असल्याने मच्छीमारांसाठी अधिकच फायदेशीर ठरू लागली आहे.समुद्रातील ३५ ते ४० वाव पृष्ठभागावरील मासेमारीला पर्सियन नेट फिशिंग तर ५० ते ७० वाव समुद्रात खोल मासेमारी केली जाते त्याला खोल डीप फिशिंग म्हटले जाते. राज्यातील मच्छीमार या दोन्ही प्रकारातील मासेमारी करतात. पर्सियन नेट फिशिंग पद्धतीत समुद्राच्या भूपृष्ठावरील ४ ते ५ किमी परिघातील परिसरात ३५ ते ४० वाव खोलीपर्यंत पर्सियन नेट फिशिंग केली जाते. गोल परिघातील वर्तुळामध्ये शिशाच्या गोळ्या बांधलेली जाळी समुद्रात सोडली जातात. गोलाकार सिक केल्यानंतर मासळी अलगद जाळ्यात अडकली जाते. त्यानंतर यंत्राच्या साहाय्याने जाळी मच्छीमार बोटीत खेचली जातात. खोल समुद्रातील डिप फिशिंग पद्धतीतील मासेमारीसाठी मच्छीमारांना ५० ते ७० वाव खोल समुद्रात जावे लागते. त्यासाठी एका ट्रिपसाठी १८ ते २० दिवस खर्ची घालावे लागतात. खोल समुद्रातील एका ट्रिपसाठी दीड ते पावणे दोन लाखापर्यंत खर्च येतो. समुद्राच्या तळाशी असलेली सर्वच प्रकारची मासळी या पद्धतीत पकडली जाते. चांगल्या प्रतीची निर्यात करण्याजोगी मासळी खोल समुद्रातील मासेमारीत मिळत असल्याने या पद्धतीच्या मच्छीमारांची संख्या सर्वाधिक आहे. वाढती महागाई, इंधनाचे भाव, समुद्रात मासळीचा दुष्काळ अशा विविध कारणांमुळे मच्छीमार व्यावसायिक याआधीच पार मेटाकुटीला आले आहेत. या संकटाशी सामना करण्यासाठी आता मच्छीमारांनी नव्या पद्धतीचा सर्च लाइट फिशिंग फंडा शोधून काढला आहे. या नव्या सर्च लाइट फिशिंग पद्धतीला शासनाकडून मान्यता आहे की नाही याबाबत काही कळू शकले नाही. (वार्ताहर)
सर्च लाइट फिशिंग पद्धतीचा नवा फंडा
By admin | Published: April 21, 2017 12:16 AM