पनवेलमध्ये नवीन वर्षात नवी करप्रणाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 01:22 AM2020-01-05T01:22:13+5:302020-01-05T01:22:17+5:30
नवीन वर्षात पनवेल महापालिकेकडून नवीन करप्रणाली सुरू करण्यात येणार आहे
वैभव गायकर
पनवेल : नवीन वर्षात पनवेल महापालिकेकडून नवीन करप्रणाली सुरू करण्यात येणार आहे, याकरिता अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित सॉफ्टवेअरही पालिका तयार करणार आहे. यासाठी नव्याने दहा नागरी सुविधा केंद्र पालिकेच्या मार्फत उभारली जाणार आहेत.
पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र नगरपालिका प्रशासन संचालनालयाकडून राज्यभर वापरल्या जाणाऱ्या एबीएम सॉफ्टवेअरचा वापर बंद करण्यात आला होता. मागील तीन वर्षांपासून सॉफ्टवेअर यंत्रणेची देखभाल दुरुस्ती पाहणाºया कर्मचाऱ्यांची नियुक्तीही रद्द करण्यात आली. त्यामुळे पनवेल महापालिकेच्या विविध विभागांतील कार्यान्वित सॉफ्टवेअरमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. वारंवार होणाºया अडचणी लक्षात घेऊन एप्रिल २०२० पासून महापालिका क्षेत्रात मालमत्ता कर लागू करून करआकारणी सुरू करणार आहे.
आयुक्त गणेश देशमुख यांनी नवी करयंत्रणा राबविण्यासाठी महापालिकेचे स्वतंत्र अॅप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर अॅप विकसित करण्यासाठी येणाºया ४८ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीनेही मंजुरी दिली आहे. स्थापत्य सल्लागार कंपनीला हे काम देण्यात आले आहे. यापूर्वी नागरी सुविधा केंद्र आणि महापालिकेच्या विविध विभागाचे काम एकाच सॉप्टवेअरमधून चालायचे. मात्र, आता यापुढे करविभागासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर असणार आहे.
महापालिकेच्या ४ प्रभागांमध्ये चार नागरी सुविधा केंद्रात आणि इतर सहा केंद्र नागरिकांच्या सोईनुसार महापालिका क्षेत्रात उभारण्यात येणार असून, यात बसस्थानक, रेल्वेस्थानकाचा समावेश असल्याची माहिती करविभागाकडून देण्यात आली. नागरिक सुविधा केंद्र उभारून ती चालविण्यासाठी खासगी ठेकेदाराची नियुक्ती केली जाणार असून, महापालिका क्षेत्रातून सुमारे २०० कोटी कर गोळा करण्यासाठी दरवर्षी एक कोटी ६० लाख रुपये खर्च करणार आहेत.
दहा नागरी सुविधा केंद्रांसह तिथे लागणारे मनुष्यबळ, स्टेशनरी, तांत्रिक बाबी पाहण्याचे कामही ठेकेदार करणार आहे. महापालिकेची नवी करप्रणाली एप्रिल २०२० पासून लागू करून मागील तीन वर्षांचा कर आकारण्यात येणार आहे.
>सॉफ्टवेअरद्वारे महापालिका क्षेत्रातील रहिवाशांना आॅनलाइन कर भरता येणार आहे, याकरिता पालिका अथवा प्रभाग कार्यालयात खेटे मारावे लागणार नाहीत. संबंधित अॅप्लिकेशन हे सर्वप्रकारच्या मोबाइलवर उपलब्ध असणार आहे. सॉफ्टवेअर कर संकलनासंबंधी हरकती तसेच सूचनाही नमूद करता येणार आहेत.
>तीस हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण
पनवेल महापालिकेमार्फत पालिका क्षेत्रात मालमत्ता सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. सध्याच्या घडीला दोन लाख ३० हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. महिनाभरात हे सर्वेक्षण पूर्ण होणार आहे. हा आकडा तीन लाखांच्या वर जाण्याची शक्यता आहे.
>मालमत्ता करआकारणीसाठी आॅनलाइन सॉफ्टवेअर सुरू केल्याने नागरिकांना घरबसल्या कर भरता येणार आहे. लवकरच सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम पूर्ण होईल.
- गणेश देशमुख,
आयुक्त,
पनवेल महापालिका