अरूणकुमार मेहत्रेकळंबोली : सिडको वसाहतीतील कचरा उलण्याची सेवेचे हस्तांतरण करून घेण्यास पनवेल महानगरपालिकेने सहमती दर्शवली आहे. महापौरांनी तसे पत्र सिडको प्रशासनाला दिले आहे. त्यानुसार १ जानेवारीपासून महापालिका घनकचरा व्यवस्थापन करणार असल्याने सिडकोचा कार्यभार हलका होणार आहे.पनवेल महापालिकेत नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा आणि नावडे हे नोड समाविष्ट झाले आहेत. या ठिकाणी जवळपास दररोज चारशे टन कचºयाची निर्मिती होते. त्याकरिता चाळ येथे क्षेपणभूमी तयार करण्यात आलेली आहे; परंतु येथे शास्त्रशुद्धपद्धतीने कचºयाची विल्हेवाट लावली जात नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथे कचरा डम्प करण्यास विरोध दर्शवला जात आहे. सर्वात महत्त्वाची बाब अशी की प्रदूषण नियंत्रण महामंडळानेसुद्धा सिडकोला याबाबत नोटीस बजावली आहे. त्यामुळे सिडको वसाहतीतील कचºयाचे व्यवस्थापन अडचणीत आहे. त्यातच ठेकेदाराकडून कचरा उचलताना नियमांचे उल्लंघन केले जात आहे. कॉम्पॅक्टरऐवजी डंम्पर आणि जेसीबीने कचरा उचलला जात आहे. या संदर्भात अनेक तक्र ारी आरोग्य विभागाकडे येत आहेत. नियमित कचरा उचलला जात नसल्याची बोंबसुद्धा आहे. त्याचबरोबर कळंबोलीतील ठेकेदार कचºयाचे वजन वाढविण्याकरिता माती मिक्स करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एकंदर सिडको, ठेकेदार आणि कचरा या तीन गोष्टींबाबत रहिवाशांच्या मनात तीव्र संताप आहे. स्मार्ट सिटींची भाषा करणाºया सिडकोला शास्त्रशुद्धपद्धतीने घनकचरा व्यवस्थापन करण्यास गेल्या काही वर्षांत अपयश आले, म्हणून ही सेवा पनवेल महानगरपालिकेकडे वर्ग करण्याकरिता सिडकोचा प्रयत्न सुरू आहे.
नवीन वर्षात पनवेल महापालिका कचरा उचलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:57 AM