नेरुळमधून जलवाहतुकीला नवीन वर्षाचा मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 02:38 AM2020-12-08T02:38:17+5:302020-12-08T02:38:38+5:30
Navi Mumbai : रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक वाहतूक यंत्रणा निर्माण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत.
नवी मुंबई : मागील अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला नवी मुंबई ते मुंबईदरम्यानचा सागरी प्रवास आता दृष्टिपथात आला आहे. नेरुळ येथे जेट्टी उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जलवाहतूक सुरू करण्यासाठी सिडकोने मे, २0२१चा मुहूर्त निश्चित केला आहे. त्या दृष्टीने संबंधित विभागाकडून चाचपणी सुरू आहे.
रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक वाहतूक यंत्रणा निर्माण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत. त्यानुसार, मुंबई पोर्ट ट्रस्ट, जेएनपीटी आणि मेरिटाइम बोर्ड यांच्या संयुक्त सहकार्यातून सिडकोने नवी मुंबई ते मुंबईदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात नेरुळ येथे जेट्टी उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एप्रिल, २0१८ मध्ये या जेट्टीच्या उभारणीला मंजुरी मिळाली होती. त्यासाठी सुमारे १११ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु कोरोनाचा संसर्ग आणि इतर तांत्रिक अडचणीमुळे हे काम काही प्रमाणात रखडले होते. असे असले, तरी मागील काही महिन्यांपासून जेट्टीच्या कामाने वेग घेतला आहे. गेल्या महिन्यात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पाला भेट देऊन कामाची पाहणी केली होती. त्यानुसार, पुढील पाच-सहा महिन्यांत जेट्टीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. पुढील चार-पाच महिन्यांत नेरुळ जेटीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर, या जेट्टीचे मेरिटाइम बोर्डाकडे हस्तांतरण करण्यात येईल. एकूणच मे, २0२१ मध्ये नवी मुंबई ते मुंबईदरम्यान सागरी मार्गाचा
प्रवासी वाहतुकीचा पहिला टप्पा सुरू करण्याची सिडकोची योजना आहे.
वाहतूककोंडी कमी करण्याच्या दृष्टीने जलवाहतुकीचा पर्याय सर्वोत्तम मानला जात आहे. त्यानुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अलिबाग आणि मांडवा ही शहरे जलमार्गाने जोडण्याची सरकारची योजना आहे.
पहिल्या टप्प्यातील काम
या जलवाहतूक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात नेरुळ जेट्टीचा विकास केला जात आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या विकासाचे काम हाती घेतले जाणार आहे. या टप्प्यात वाशी आणि बेलापूर येथील जेट्टी प्रस्तावित आहेत. या तिन्ही जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईसह अलिबागसुद्धा नवी मुंबईला जलमार्गाद्वारे जोडण्याची योजना आहे.
सरकारची योजना
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अलिबाग आणि मांडवा ही शहरे जलमार्गाने जोडण्याची सरकारची योजना आहे. हे जलमार्ग सुरू झाल्यानंतर रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे, तसेच प्रवासी वाहतुकीच्या कंटाळवाणा प्रवासाचा कालावधीसुद्धा काही तासांनी कमी होणार आहे.