नेरळ : कर्जत तालुक्यासह सर्वत्र गुढीपाडवा आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले; परंतु कळंब विभागात नववर्षाचे स्वागत विजेच्या लपंडवाने झाल्याने नागरिकांकडून महावितरणच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. दिवसभरातून २५ ते ३० वेळा लाइट ये-जा करत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. मंगळवारी सकाळी परिसरातील ग्रामस्थांनी आपल्या घरासमोर गुढी उभारली, त्यानंतर शोभायात्रा काढून नववर्षाचे स्वागत करण्यात आले; परंतु विजेने तर दिवसभर कहरच केला. मंगळवारी सकाळपासून रात्रीपर्यंत सुमारे २५ ते ३० वेळा लाइट ये-जा करत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. अनेक ठिकाणी तर गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते; परंतु वीजप्रवाह खंडित होत असल्याने त्याचा फटकाही आयोजकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला.उन्हाळ्याचे दिवस, त्यात लाइट नसल्याने मोठ्या प्रमाणात घामाचे लोट अंगातून येत असतात आणि अंगाची लाहीलाही होत असताना अशा परिस्थितीत विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. कळंब येथील महावितणचे शाखा अभियंता जाधव यांची बदली झाल्यानंतर त्यांचा चार्ज कर्जत येथील थोरात यांना देण्यात आला आहे; परंतु ते कळंब परिसरात फिरकत नसल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे असून त्यांनी दररोज कार्यालयात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (वार्ताहर)
नवीन वर्षाची सुरु वात विजेच्या लपंडावाने
By admin | Published: March 30, 2017 6:45 AM