पनवेल : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच रायगडमधील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे समोर आले आहेत. शासकीय आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेमुळेे म्हसळा येथे एका मुलाच्या मृत्यूची घटना ताजी असताना पनवेलमध्येही तशीच घटना घडली आहे.
महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या दोन दिवसांच्या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. मुलाची तब्येत खालावल्यानंतर रुग्णाला तपासण्यासाठी डॉक्टर आलेच नसल्याची तक्रार मुलाच्या पालकांनी केली आहे. गर्भवती महिला पनवेल तालुक्यातील आदई येथे वास्तव्यास होती.
... तर बाळाचा मृत्यू झाला नसता
रविवारी सकाळी प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर महिलेची घरातच डिलिव्हरी झाली. सकाळी साडेदहा वाजता प्रसूती झाल्यानंतर त्यांना लगेच उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर आई आणि बाळ दोघेही व्यवस्थित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ च्या सुमारास बाळाला ताप आल्याचे परिचारिकेला कळविले. परिचारिकेने बाळाला दूध पाजायला सांगून कोणाला तरी पाठवते, असे सांगितले. मात्र, परिचारिका, डॉक्टर फिरकलेच नाहीत. त्यानंतर बाळाला आई स्वत: घेऊन परिचारिकेकडे गेली. बाळ हालचाल करीत नसल्याचे सांगितले.
त्यानंतर आलेल्या डॉक्टरांनी तपास केल्यानंतर बाळाचा मृत्यू झाल्याचे कळविले. प्रसूतीनंतर २४ तास बाळ व्यवस्थित होते. डॉक्टर वेळीच हजर असते तर बाळाचा मृत्यू झाला नसता, असा आरोप बाळाच्या आईने केला आहे.
संबंधित घटना अत्यंत दुर्दैवी आहे. बाळाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होईल. - डॉ. शिवाजी पाटील (अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पनवेल)