सेंट्रल पार्कसाठी पुढच्या वर्षीचा मुहूर्त, सिडकोचा दहा वर्षांपासून रखडलेला प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 01:21 AM2020-12-23T01:21:06+5:302020-12-23T01:21:41+5:30
CIDCO : मध्यंतरी मनोरंजन पार्कचा विषय सिडकोमार्फत रोखून धरण्यात आला. केवळ छोटे उद्यान विकसित करण्याचा निर्णय सिडकोने घेतला.
- वैभव गायकर
पनवेल : गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या सेंट्रल पार्कच्या दुसऱ्या टप्प्याच्या उभारणीसाठी महाविकास आघाडी सरकारने हालचाली सुरू झाल्या आहेत. सिडकोच्या या रखडलेल्या प्रकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले असल्याने, २०२१ मध्ये या ठिकाणी सार्वजनिक व खासगी भागीदारीतून उभारल्या जाणाऱ्या आंतराष्ट्रीय मनोरंजन पार्कच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांचा मानस आहे.
मध्यंतरी मनोरंजन पार्कचा विषय सिडकोमार्फत रोखून धरण्यात आला. केवळ छोटे उद्यान विकसित करण्याचा निर्णय सिडकोने घेतला. या निर्णयाचे मोठे पडसाद खारघरमध्ये उमटले. खारघरवासीयांना ६३ हेक्टरवर सेंट्रल पार्कचे स्वप्न सिडकोने दाखविल्याने, मोठ्या संख्येने नागरिकांनी खारघर शहरात घरे खरेदी करण्यास पसंती दिली. सेंट्रल पार्क विकसित होण्यास झालेला उशीर लक्षात घेता, खारघरवासीयांनी सह्यांची मोहीम राबवत थेट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. या संदर्भात ऑनलाइन जनहित याचिका दाखल करण्यात आली. सिडकोने चुकीच्या पद्धतीने मंजूर निविदा अपात्र ठरविण्याच्या निर्णयाविरोधात संबंधित पार्क उभारणीसाठी पुढाकार घेतलेली यश क्रिएशन्स व व्हेंचर या कंपनीने न्यायालयात धाव घेतली आहे. दहा वर्षांच्या प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या या प्रकल्पाच्या उभारणीला २०२१ मध्ये मुहूर्त मिळण्याची शक्यता असून राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, संबंधित प्रकल्प खासगी आणि सार्वजनिक भागीदारीतून उभारण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याकरिता १,६०० कोटींचे आर्थिक पाठबळ यश क्रिएशन्स उभारणार आहे. सिडकोला या प्रकल्पात एकही रुपयाचा खर्च करण्याची आवश्यकता नसल्याने, या प्रकल्पातून सिडकोला मोठ्या प्रमाणात नफा मिळणार आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती घेऊनच प्रतिक्रिया देता येईल, अशी प्रतिक्रिया सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातंबे यांनी दिली.
...असे असेल मनोरंजन पार्क
आंतराष्ट्रीय दर्जाचे अम्युझमेंट पार्क, वॉटर पार्क, चिल्ड्रन पार्क, सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर म्युझिकल फाउंटेन, व्हर्चुअल रिॲलिटी शो, स्नो पार्क, पंचतारांकित हॉटेल्स आदींचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे खोपोली येथील ॲडलॅब्स इमॅजिका व एस्सल वर्ल्डपेक्षा मोठे हे पार्क असणार आहे.