दहा लाखाच्या एमडीसह नायझेरियनला अटक ; वहाळमध्ये गुन्हे शाखा व कोपर खैरणे पोलिसांची कारवाई
By सूर्यकांत वाघमारे | Published: April 22, 2024 06:56 PM2024-04-22T18:56:30+5:302024-04-22T18:57:33+5:30
वहाळ परिसरात एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती कोपर खैरणे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील यांना मिळाली होती.
नवी मुंबई : एमडी विक्रीसाठी आलेल्या एका नायझेरियन व्यक्तीला पोलिसांनी वहाळ ते किल्ला जंक्शन मार्गावरून अटक केली आहे. त्याच्याकडून दहा लाखाचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. गुन्हे शाखा व कोपर खैरणे पोलिसांच्या पथकाने एनआरआय पोलिस ठाणेच्या हद्दीत हि कारवाई केली आहे.
वहाळ परिसरात एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती कोपर खैरणे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील यांना मिळाली होती. याबाबत त्यांनी अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांना कळवले होते. त्यानुसार गुन्हे शाखा व कोपर खैरणे पोलिस यांच्या पथकाने संयुक्तरित्या शनिवारी रात्री वहाळ परिसरात सापळा रचला होता. त्यामध्ये दुचाकीवरून आलेल्या एका नायझेरियन व्यक्तीवर त्यांनी पाळत ठेवली होती.
हि व्यक्ती रस्त्यालगत संशयास्पदरित्या उभी राहिली असता पोलिसांनी घेराव घालून त्याला ताब्यात घेतले. यावेळी अंग झडतीमध्ये त्याच्याकडे १०१ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ मिळून आला. बाजारभावानुसार १० लाख १० हजार रुपये त्याची किंमत आहे. हे ड्रग्स घेऊन तो विक्रीसाठी त्याठिकाणी आला होता. याप्रकरणी त्याच्यावर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओईनकेवुकेवु आयफिनयी (३०) असे त्याचे नाव असून तो खारघरचा राहणारा आहे. त्याच्यामार्फत इतरही ड्रग्स विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.