नवी मुंबई : गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तसेच बेकायदा वास्तव्य करणाऱ्या २७ नायजेरियन व्यक्तींची पोलिसांनी मायदेशी रवानगी केली आहे. चालू वर्षात नऊ महिन्यांत ठिकठिकाणी कोम्बिंग आॅपरेशन करून त्यांचा शोध घेऊन या कारवाई करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुंबई, बंगळुरू पोलिसांना पाहिजे असलेले तीन गुन्हेगारही पोलिसांच्या हाती लागले आहेत.शहरातील नायजेरियन व्यक्तींचे वाढते वास्तव्य पोलिसांची तसेच नवी मुंबईकरांची डोकेदुखी ठरत आहे. मात्र, गाव-गावठाण भागात त्यांना आश्रय मिळत असल्याने त्यांचा शोध घेण्यात पोलिसांची कसोटी लागत आहे. मागील काही वर्षांत नवी मुंबईत वास्तव्याला असलेल्या नायजेरियन व्यक्तींचा आॅनलाइन फ्रॉड तसेच अमली पदार्थ विक्रीत सहभाग दिसून आला आहे.शिक्षणाच्या व्हिजावर भारतात प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडून राहण्याचे ठिकाण बदलून व्हिजा संपल्यानंतरही भारतात ठाण मांडले जात आहे. अशा बेकायदा वास्तव्य करणाºया नायजेरियनांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना कोम्बिंग आॅपरेशन करावी लागत आहेत. त्यानुसार चालू वर्षात सप्टेंबर अखेरपर्यंत २७ नायजेरियन व्यक्तींवर कारवाई करून त्यांना मायदेशी पाठवण्यात आले आहे. तर २०१८ मध्येही चार जणांना भारताबाहेर पाठवण्यात आल्याने दोन वर्षांत ३१ नायजेरियन व्यक्तींना बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी तसेच गुन्हेगारी कृत्यामुळे मायदेशी हाकलण्यात आले आहे. या कारवाई करताना पोलिसांची दमछाक होताना दिसत आहे. त्यांना पकडल्यानंतर मायदेशी पाठवेपर्यंत पोलिसांना त्यांच्यावर पाळत ठेवावी लागत आहे. यादरम्यान त्यांना ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा नसल्याने त्यांच्या राहत्या जागेतच बंदी म्हणून त्यांना ठेवावे लागत आहे. मात्र, यादरम्यान त्यांच्याकडून तीव्र प्रतिकार होत असल्याने पोलिसांना अनेक कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यानंतरही सर्व परिस्थितीला सामोरे जात विशेष शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नायजेरियन व्यक्तींवर कारवार्इंचा धडाका सुरूच असल्याचे दिसत आहे.नुकतेच पोलिसांनी उलवे परिसरातही छापा टाकून सुमारे २७ नायजेरियन व्यक्तींची झाडाझडती घेतली होती. त्यापैकी दहा जणांच्या भारतात राहण्याच्या व्हिजाची मुदत संपलेली असतानाही ते बेकायदेशीरपणे राहत असल्याचे आढळून आले होते. त्यापैकी तिघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली होती. या वेळी अधिक चौकशीत अमली पदार्थ विक्रीप्रकरणी दोघांच्या शोधात मुंबई पोलीस तर एकाच्या शोधात बंगळुरू पोलीस असल्याचे समोर आले होते.त्याशिवाय खारघर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल असलेले व अनेक दिवसांपासून फरार असलेल्या महिला व पुरुष नायजेरियन व्यक्तींनाही कोम्बिंग आॅपरेशन दरम्यान शोधून काढण्यात आले.एखाद्या गुन्ह्यात पकडल्यानंतर अनेकदा विदेशी राजदूतांपुढे नायजेरियन व्यक्तींकडून पोलिसांवर खोटे आरोप केले जातात. त्यामुळे संभाव्य अडचणींच्या भीतीने पोलिसांनाही त्यांच्यावर कारवाई करताना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे.दोन वर्षांत १७२ बांगलादेशींवर कारवाईबेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य केल्यानंतर नवी मुंबईत लपून राहणाऱ्यांमध्ये बांगलादेशी नागरिकांचीही संख्या सर्वाधिक आहे. बांधकाम मजूर म्हणून अथवा इतर ठिकाणी नोकरी मिळवून त्याच ठिकाणी ते वास्तव्य करतात.त्यानुसार मागील दोन वर्षांत अशा १७२ बांगलादेशींचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ६३ जणांची शिक्षा संपल्यानंतर त्यांना परत बांगलादेशला पाठवण्यात आले आहे.त्यामध्ये चालू वर्षात पाठवलेल्या ४६ जणांचा, तर गतवर्षी पाठवलेल्या १७ जणांचा समावेश आहे.
शहरातून नायजेरियनांची हकालपट्टी; २७ जणांना मायदेशी केले रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 1:39 AM