नायजेरियनांचे अनधिकृत वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 02:49 AM2018-03-15T02:49:52+5:302018-03-15T02:49:52+5:30
तळोजा परिसरामध्ये नायजेरियन नागरिकांचे वास्तव्य वाढले आहे. जादा भाडे मिळण्याच्या आमिषाने विदेशी नागरिकांना घरे भाडेतत्त्वावर दिली जातात.
- शैलेश चव्हाण
तळोजा : तळोजा परिसरामध्ये नायजेरियन नागरिकांचे वास्तव्य वाढले आहे. जादा भाडे मिळण्याच्या आमिषाने विदेशी नागरिकांना घरे भाडेतत्त्वावर दिली जातात. याविषयी माहिती पोलिसांना दिली जात नसल्याने या परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
खारघरपाठोपाठ आता तळोजा फेज १ व फेज २ या परिसरात नायजेरियन नागरिकांचे वास्तव्य वाढत आहे. या परिसरामध्ये घर भाड्याचे दर ३ ते ४ हजार आहेत. पण नायजेरियन नागरिक ६ ते ८ हजार रूपये भाडे देत आहेत. जादा पैसे मिळत असल्याने त्यांना घरे भाडेतत्त्वावर देण्याचे प्रमाण वाढत आहे. वास्तविक पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये कोणतेही विदेशी नागरिक वास्तव्य करत असतील तर त्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. त्यांचा पासपोर्ट ते कोणत्या कामासाठी या परिसरात वास्तव्यासाठी आले आहेत या विषयी माहिती देणे आवश्यक असते. पोलिसांच्या परवानगीनंतरच त्यांना वास्तव्य करता येते. परंतु सद्यस्थितीमध्ये बहुतांश नायजेरियन नागरिक विनापरवाना वास्तव्य करत आहेत. त्यांच्या वास्तव्याची कोणतीही अधिकृत माहिती पोलीस आयुक्तालय व स्थानिक पोलीस स्टेशनलाही दिली जात नाही. तळोजा फेज १ या ठिकाणी आलेल्या सेक्टर २६ या ठिकाणी या नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे पहावयास मिळत आहे. यामधील काही मद्यपान व इतर नशा करत असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत. यामधील काही जण चरस, गांजा यासारखे अमली पदार्थांचे सेवन करत असून विक्री करत असल्याची शंका शेकापचे नगरसेवक हरेश केणी यांनी व्यक्त केले आहे. खारघर या ठिकाणी असलेल्या मोठमोठ्या विद्यापीठांच्या बाहेर हीच मंडळी अमली पदार्थांची तस्करी करत आहेत, मात्र कोणतीही कारवाई होताना दिसत नाही असे ते म्हणाले.
नवी मुंबईमध्ये कोपरखैरणे, बोनकोडे परिसरामध्ये नायजेरियन नागरिकांची संख्या वाढली होती. तेथे नागरिकांचा विरोध वाढू लागल्यामुळे व अनेकांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे नवी मुंबईतून अनेकांनी खारघर व तळोजा परिसरात स्थलांतर केले आहे. नवी मुंबईपेक्षा कमी दराने घरे उपलब्ध होत असल्यामुळे येथे बिनधास्तपणे वास्तव्य करत आहेत. याठिकाणी राहणाऱ्या विदेशी नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात यावे. अनधिकृतपणे जे वास्तव्य करत असतील त्यांच्यावर कारवाई करून मूळ देशी पाठविण्यात यावेत.
पासपोर्ट असणारे परंतु घर भाड्याने दिल्याची नोंद नसल्यास घर मालकांवर कारवाई करण्याची मागणीही होवू लागली असून पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
तळोजा परिसरात नायजेरियन नागरिकांच्या वास्तव्याचे प्रमाण वाढत आहे. अनेक जण चरस, गांजासारखे अमली पदार्थांचे सेवन करत आहेत. परिसरामध्ये अमली पदार्थांची तस्करी करत असल्याची शक्यता आहे. या सर्वांची चौकशी करावी व विनापरवाना वास्तव्य करणाºयांवर कारवाई करावी.
- हरेश केणी,
नगरसेवक, शेकाप
जास्त घरभाडे मिळत असल्याने नायजेरियन नागरिकांना आश्रय दिला जात आहे. अशाप्रकारे घरे भाड्याने दिली असल्यास पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन यापूर्वीच नागरिकांना करण्यात आले आहे. याविषयी माहिती घेवून योग्य कार्यवाही केली जाईल.
- रवींद्र बुधवंत,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
तळोजा