कर्जत : तालुक्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडू नये, यासाठी रात्रशाळेच्या धर्तीवर उपक्रम लोभेवाडीमध्ये सुरू झाला आहे. उच्चशिक्षित आदिवासी तरुणाच्या या उपक्रमाचे कौतुक कर्जत तालुका शिक्षण विभागाने केले आहे.सध्या सर्वत्र ऑनलाइन शिक्षण दिले जात असून, जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षणही ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले आहे. असे शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घेण्यासाठी अनेक प्रकारे अडचणी येत आहेत.
स्मार्ट फोन आपल्या पालकांकडे नसल्याने आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहात असल्याचे जाणवत आहे. मात्र, आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाल्याने त्यांचे शिक्षण अर्धवट थांबू आणि खंड पडू नये, यासाठी लोभेवाडी गावातील उच्चशिक्षित तरुण मोतीराम भिका पादिर हे विद्यार्थ्यांच्या मदतीला आले आहेत.
कर्जत तालुका आदिवासी संघटना सचिव असलेले पादिर हे कर्जत येथे फायनान्स कंपनीत दिवसभर काम करतात. त्यानंतर, घरी येऊन सायंकाळी दररोज आपल्या लोभेवाडी गावातील घरात विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतात. यावेळी सोशल डिस्टन्स ठेवून, तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधून ठरावीक अंतरावर त्यांना बसवून आपल्या घरात अभ्यास करवून घेत आहेत.
मोतीराम पादिर यांच्या या कार्याची माहिती मिळताच, कर्जत शिक्षण विभागाच्या पाथरज केंद्राचे केंद्रप्रमुख बाळासाहेब पालवे, तसेच राष्ट्रीय सेवा संघ जन कल्याण समितीचे आनंद राऊळ, लोभेवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक त्र्यंबक चवरे, उपशिक्षक दहिफळे यांनी लोभेवाडीमध्ये येऊन रात्री घेतल्या जाणाऱ्या शिकवणी वर्गाचे कौतुक केले. ग्रामीण वाडी-वस्तीवरील सुशिक्षित तरुणांनी विद्यार्थांच्या पालकांची अनुमती घेऊन, अशाच प्रकारे शिकवणी वर्ग घेतल्यास विद्यार्थ्यांसाठी नक्कीच उपयुक्त ठरतील, असे केंद्रप्रमुख बाळासाहेब पालवे यांनी सांगितले.
या प्रसंगी पोलीस पाटील मारुती लोभी, तसेच ग्रामस्थ काशिनाथ पादिर, सुनील लोभी, काशा पादिर, काशिनाथ लोभी, जगन पादिर, अशोक लोभी, रघुनाथ पादिर, दामोदर लोभी, दत्ता लोभी, उत्तम पादिर, संजय पादिर, कृष्णा लोभी इत्यादी ग्रामस्थही आपल्या मुलांचा अभ्यास कसा सुरू आहे, हे पाहण्यासाठी उपस्थित होते.