नाईक समर्थकांनी केले शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 02:34 AM2019-07-31T02:34:09+5:302019-07-31T02:34:25+5:30
कार्यालयात पदाधिकाऱ्यांची गर्दी : सोबत कोण आहे आजमावण्याचा प्रयत्न; भाजपमध्ये जाण्याचा केला ठराव
नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक समर्थकांनी पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर शहरात शक्तिप्रदर्शन केले. ठाणे-बेलापूर रोडवरील कार्यालयामध्ये दोन हजारपेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. सोबत कोण आहे व विरोधात कोण जाणार हे आजमावण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला. या वेळी झालेल्या सभेत भाजपात जाण्याचा ठराव करून तो एकमताने मंजूर करून घेण्यात आला.
राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्व नगरसेवक भारतीय जनता पक्षात जाणार असल्याचे नाईक समर्थकांनी सोमवारी स्पष्ट केले होते. नगरसेवक व पदाधिकाºयांनी मंगळवारी व्हाइट हाउस कार्यालयामध्ये जाऊन गणेश नाईक यांची भेट घेण्याचे निश्चित केले होते. याविषयी संदेश मोबाइलवरून सर्व पदाधिकाºयांना सोमवारी सायंकाळी व मंगळवारी सकाळी पाठविण्यात आले होते. गणेश नाईक यांना भाजपात जाण्यासाठी विनंती करण्यासाठी जाणार असल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले असले तरी प्रत्यक्षात मात्र पक्षांतर करताना कोण सोबत आहे व कोण विरोधात जाणार हे आजमावण्यासाठीचा हा प्रयत्न होता. कार्यालयामध्ये कोणते नगरसेवक व पदाधिकारी आले याची माहिती घेतली जात होती. न आलेल्या पदाधिकाºयांना सहकारी फोन करून का आला नाहीत, याविषयी विचारणा केली जात होती. कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये सर्वच पदाधिकाºयांनी शहराच्या विकासासाठी भाजपमध्ये जावे, अशी मागणी केली. भाजपमध्ये जाण्यासाठी ठराव करून एकमुखाने सहमती घेण्यात आली.
नगरसेवक व प्रमुख पदाधिकाºयांनी कार्यालयात गर्दी केल्यानंतर गणेश नाईक स्वत: सर्वांना मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; परंतु शेवटपर्यंत नाईक परिवारातील कोणीही कार्यकर्त्यांसमोर येऊन मनोगत व्यक्त केले नाही. यामुळे काही पदाधिकाºयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. दिवसभर शहरात नाईकांच्या पक्षांतराचीच चर्चा सुरू होती. सोबत कोण जाणार व राष्ट्रवादीमध्ये कोण राहणार याकडे सर्वपक्षीयांचे नेते लक्ष ठेवून होते.
पालिकेच्या स्थापनेपासून नाईक यांच्या पुढाकाराने शहराचा विकास झाला आहे. शहरातील प्रलंबित विषय मार्गी लागण्यासाठी प्रवाहाबरोबर जाणे योग्य असून याबाबत नगरसेवकांचे एकमत झाले आहे. याबाबत नाईक यांना विनंती करण्यात आली असून नाईक जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.
- अनंत सुतार,
जिल्हाध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस, नवी मुंबई
नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून पालिकेत गणेश नाईक यांचे वर्चस्व आहे. साडेचार वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करताना गळचेपी होत आहे. शहराच्या विकासासाठी पक्ष बदलण्याची नगरसेवकांच्या माध्यमातून नाईक यांना विनंती करण्यात आली असून लवकरच भूमिका स्पष्ट होईल.
- रवींद्र इथापे, सभागृह नेता
देशात ज्याप्रमाणे वारे वाहत आहे त्याप्रमाणे आपल्यालाही जावे लागेल, प्रवाहाच्या विरोधात जाऊन चालणार नाही. यापूर्वीही आम्ही गणेश नाईकांच्या मागे होतो आणि यापुढेही राहणार आहोत.
- सुधाकर सोनावणे, माजी महापौर
शरद पवारांची साथ सोडायची नाही, असे नाईक यांचे मत आहे; परंतु शहर आणि कार्यकर्ते हे नाईक यांचा वीक पॉइंट असून, प्रवाहासोबत जावे अशी नगरसेवकांनी मागणी आहे. त्यांचा निरोप नाईक यांना पोहोेचविण्यात आला असून लवकर दिशा समजेल.
- सूरज पाटील,
युवक जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी