मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोट केसमधील आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत आरोप ठेवला जाऊ शकतो का? याची पडताळणी राष्ट्रीय तपास पथक (एनआयए) करत असल्याची माहिती खुद्द एनआयएने मंगळवारी विशेष मोक्का न्यायालयाला दिली. त्यामुळे विशेष न्यायालयाने या केसवरील सुनावणी १५ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे.२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावातील अत्यंत संवेदनशील परसिरात मोटरसायकलमध्ये बॉम्ब ठेवून बॉम्बस्फोट घडवण्यात आला. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर १०१ जखमी झाले. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) यासंबंधी ११ जणांना अटक केली. त्यात साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित व अन्य नऊ जणांचा समावेश आहे. जानेवारी २००९ मध्ये एटीएसने सर्व आरोपींवर मोक्कांतर्गत आरोपपत्र दाखल केले. मात्र २०११ मध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या दहशतवादी कृत्याच्या सर्व केसेस एनआयएकडे वर्ग करण्यात आल्या. या केसवर देखरेख करणाऱ्या कायदेतज्ज्ञांना व तपासधिकाऱ्यांना ही केस मोक्कांतर्गत कशी नोंदवण्यात आली? असा प्रश्न पडला आहे. त्यांना यावर आक्षेप आहे.त्यांनी हा मुद्दा अॅटर्नी जनरल यांच्यापुढे मांडला असून ते लवकरच याबाबत त्यांचे मत स्पष्ट करतील, अशी माहिती एनआयचे वकील अविनाश रसाळ यांनी विशेष मोक्का न्यायालयाला दिली. विशेष सरकारी वकील रोहिणी सॅलियन यांनी केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली होती. (प्रतिनिधी)
आरोपांची पडताळणी एनआयएन करणार
By admin | Published: February 03, 2016 3:42 AM