नवी मुंबई : शहरात दोन दिवसांत अपघातांच्या नऊ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी बहुतांश घटनांमध्ये अपघाताला कारणीभूत चालकांनी पळ काढल्याचे समोर आले आहे.
वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होऊनही चालकांमध्ये शिस्त लागत नसल्याचे समोर येत आहे. यामुळे अपघातांच्या घटना घडत असून त्यात जीवितहानीही होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून नुकताच रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला होता. तो संपताच शहरात पुन्हा अपघातांची मालिका सुरू झाल्याचे दिसून येत आहे.दोन दिवसांत परिमंडळ एक मध्ये अपघातांच्या नऊ घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून, ८ जण जखमी झाले आहेत.
सायन-पनवेल मार्गावर वाशीतील जुई पुलावर यापूर्वीही अपघात घडले आहेत. शुक्रवारी पहाटे अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याशिवाय वाशीतच अज्ञात कारने धडक दिल्याने झालेल्या अपघतातात वैभव महेंकर जखमी झाले. तुर्भे एमआयडीसीत तीन अपघात झाले असून, त्यापैकी एका अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. निरज दुबे हे दुचाकीवरून जाताना वेगात आलेल्या जेसीबीने एका पादचाऱ्याला ठोकर मारली, त्यानंतर दुबे यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुबे व त्यांचा मित्र प्रभाकर शर्मा खाली पडले.
शर्मा यांच्या अंगावरून जेसीबीचे चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवणाºया सागर सागरे याने दुसºया दुचाकीला धडक दिल्याने त्यावरील अंकित चौहान यांना दुखापत झाली आहे. तर विरुद्ध दिशेने आलेल्या रिक्षाने ठोकर मारल्याने टोनी व्हिलफर्ड जखमी झाले. सीबीडी येथील उलवे मार्गावरील पुलावर लहू देशमुख यांच्या दुचाकीचा अपघात होऊन ते जखमी झाले आहेत. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पामबीच मार्गावर भरधाव कार अपघातात अजय शहा यांचा मृत्यू झाला. कारचालक स्वप्निल गंगावणे विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्यपान करून कार चालवल्याने ताबा सुटून ती वीजखांबाला धडकल्याने हा अपघात घडला. तर जुईनगर रेल्वेस्थानकाच्या सर्व्हिस रोडवर विद्युत खांबाला दुचाकी धडकून घडलेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.
भरधाव वेग अपघातास कारणीभूत
मागील दोन दिवसांत घडलेल्या अपघातांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, बहुतांश अपघात हे भरधाव वाहन चालविल्याने झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या बहुतांश वाहनचालकानी घटनास्थळावरून पळ काढला आहे. अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत चालकांना मार्गदर्शन करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.