नऊ लाखांच्या रुग्ण कल्याण निधीची उधळपट्टी
By Admin | Published: December 23, 2016 03:19 AM2016-12-23T03:19:07+5:302016-12-23T03:19:07+5:30
रुग्ण कल्याणनिधीची उधळपट्टी केल्याचा लाजिरवाणा प्रकार कर्जत तालुक्यातील कळंब आरोग्यकेंद्रात आयोजित रुग्ण कल्याण
कांता हाबळे / नेरळ
रुग्ण कल्याणनिधीची उधळपट्टी केल्याचा लाजिरवाणा प्रकार कर्जत तालुक्यातील कळंब आरोग्यकेंद्रात आयोजित रु ग्ण कल्याण कार्यकारी समितीच्या सभेत उघडकीस आला आहे. रायगड जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे यांच्या पुढाकारातून अत्यंत परिश्रमपूर्वक रुग्णांच्या कल्याणासाठी उभारलेला नऊ लाखांचा निधी आरोग्यविभागाच्या अधिकाऱ्यांनी अक्षरश: फुंकून टाकला आहे.
सुदाम पेमारे यांच्या पुढाकारातून १२ सदस्यीय रु ग्ण कल्याण समितीची स्थापना ४ आॅगस्ट २०१४ रोजी करण्यात आली होती. धर्मदाय आयुक्तांकडून नोंदणीकृत असलेल्या या समितीने सुमारे ९ लाख ३३ हजार इतका निधी अत्यंत परिश्रमपूर्वक संकलित करून गोरगरीब व गरजू
रु ग्णांच्या महत्त्वाच्या आरोग्यविषयक गरजा भागविण्याकरिता कळंब प्राथमिक आरोग्यकेंद्राकडे सुपूर्द केला होता. या निधीचा विनियोग कसा करायचा आहे याबाबत महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी पावरा यांना, तसेच इतर समिती सदस्यांना केल्या होत्या. मात्र,या सर्व सूचनांना तिलांजली देऊन आपण रुग्णांप्रती किती असंवेदनशील आहोत याची प्रचिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. विशेष धक्कादायक बाब म्हणजे रु ग्ण कल्याण समितीला याबाबत अंधारात ठेवण्यात आल्याचेही या सभेत निदर्शनास आले.
बहुसंख्य आदिवासी व गरीब लोकवस्ती असलेल्या कळंब आरोग्यकेंद्रातर्गत १७ महसुली गावे व २७ आदिवासी वाड्या यांचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रु ग्णांना वेळप्रसंगी मदत व्हावी, तसेच सुविधा उपलब्ध व्हावी या प्रामाणिक व शुद्ध हेतूने हा फंड उभारण्यात आला होता. रायगड जिल्ह्यातील इतर कोणत्याही तालुक्यात अशी रु ग्ण कल्याण समिती नाही जी देणगी स्वरूपात गरजू रुग्णांकरिता अशा प्रकारे निधी संकलित करते, अशी माहिती सुदाम पेमारे यांनी दिली. या पैशातून कळंब रु ग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रु ग्णाला पूरक आहार म्हणून फलाहार देण्याचा निर्णय या समितीने घेतला होता, मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून आल्याने या योजनेचा आढावा घेण्यासाठी रुग्ण कल्याण समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
रु ग्णकल्याण निधीकरिता स्वतंत्र खाते खोलण्यासंबंधी सूचना असताना त्याची अंमलबजावणी झाली नाही. चार महिन्यांपूर्वी खांडस आरोग्य उपकेंद्र व कळंब आरोग्यकेंद्रात आढळून आलेल्या ८ कुपोषित बालकांना रु ग्ण कल्याण निधीतून प्रत्येकी ५००० रु पयांचे धान्य देण्यासंबंधी अध्यक्ष सुदाम पेमारे यांनी स्वत: मुंबई येथील रु ग्णालयात उपचाराकरिता दाखल असतानाही संबंधित अधिकाऱ्यांना कळविले होते. या आदेशाकडे आरोग्य अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला. रुग्णांकरिता औषधे खरेदी करण्यासंबंधी समितीने कोणताही ठराव घेतला नसतानाही सुमारे सहा लाखांपेक्षाही जास्त किमतीची औषधे खरेदी केली असल्याची माहिती समोर आली.
या सभेबाबत १० दिवसांपूर्वी सूचना केलेली असतानाही आरोग्य केंद्राचे लेखनिक रमेश काळबेरे यांनी सभेच्या विषयासंबंधी कागदपत्रे तसेच आर्थिक व्यवहारासंबंधी कागदपत्रे मागणी करूनही सादर केली नाहीत. यावर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असा ठराव मंजूर करण्यात आला. यासंबंधीची पुढील सभा ३१ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली असून समिती अध्यक्ष यावर काय निर्णय घेतात याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. या सभेला समिती सचिव प्रमोद कोंडिलकर, सदस्य बबन भालेराव, पंचायत समिती सदस्य धर्म निरगुडा आदी उपस्थित होते.