नवी मुंबईतील नऊ पोलिसांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 11:45 PM2020-09-22T23:45:40+5:302020-09-22T23:45:53+5:30

गेल्या तीन महिन्यात कर्तव्य बजावताना संसर्ग : प्रशासनाकडून कोविड योद्ध्यांचा सन्मान

Nine policemen killed in Navi Mumbai | नवी मुंबईतील नऊ पोलिसांचा मृत्यू

नवी मुंबईतील नऊ पोलिसांचा मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : तीन महिन्यांत नवी मुंबई पोलीस दलातील ९ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू चालू महिन्यात झाला आहे, तर कोरोनावर मात न करू शकणारे हे सर्व कोविड योद्धे वयाने पन्नाशीच्या जवळपासचे आहेत.


देशभरात कोरोना पसरू लागताच लॉकडाऊन घोषित केल्यापासून ते आजतागायत नवी मुंबई पोलीस कर्तव्य बजावत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांकडून काटेकोरपणे नियमांचे पालन व्हावे व कोरोनाचा संसर्ग टळावा, यासाठी पोलिसांचे कसोटीचे प्रयत्न होते. त्याकरिता संपूर्ण पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात नाकाबंदी व बंदोबस्त लावण्यात आला होता. या दरम्यान वरिष्ठांकडून पोलिसांच्या आरोग्याची व कुटुंबाचीही काळजी घेतली जात होती. त्यामुळे जुलै महिन्यापर्यंत एकही पोलीस कोरोनामुळे दगावला नव्हता. मात्र, जुलैनंतर कोरोनाची झालेली लागण काहींच्या जिवावर बेतली आहे. त्यात अद्यापपर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांना पोलीस प्रशासनाकडून कोविड योद्धे म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
कोरोनापासून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करताना स्वत:च्या जिवाची बाजी त्यांनी लावलेली आहे. मार्च महिन्यापासून अद्यापपर्यंत नवी मुंबई पोलीस दलातील सुमारे एक हजार पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे, तर अनेकांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती.


परंतु, नवी मुंबई पोलिसांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे सर्व जण उपचार घेऊन सुखरूप घरी पोहोचले आहेत.
एखाद्या पोलिसाला कोरोनाची लागण झाल्यास, त्याच्या लक्षणावरून उपचाराची दिशा ठरवण्यासाठी वेलनेस टीम तयार करण्यात आली होती. यामुळे प्रकृती चिंताजनक असणाºयांना वेळीच उपचार मिळाल्याने संकट टळत आहे. यानंतरही उपचाराला प्रकृतीने साथ न दिल्याने अद्यापपर्यंत नऊ जणांचा कोरोनामुळे बळी घेतला आहे. त्यात दोन अधिकारी व सात कर्मचाºयांचा समावेश आहे. या सर्वांच्या त्यागाचा प्रशासनाने योग्य सन्मान करत त्यांना कोविड योद्धे असे संबोधले आहे.


मात्र, वाढत चाललेल्या मृत्यूच्या संख्येबाबत प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रत्येक पोलीस प्रत्यक्ष मैदानावर राहून जनसामान्यांच्या संपर्कात राहून कर्तव्य बजावत होता. या दरम्यान, परराज्यातील लाखो नागरिकांना सुखरूप मूळ
गावी पोहोचवले. त्यामध्ये अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा होऊनही उपचारांती ते कोरोनावर मात करून बरे झाले. त्यानंतर, जुलै महिन्यात पोलीस हवालदार अविनाश दडेकर यांच्या मृत्यूची पहिली घटना घडली.
यानंतर प्रशासन अधिक सतर्क झाले असतानाही आॅगस्ट महिन्यात भास्कर बोंबले व सुरेश म्हात्रे यांचे निधन झाले, तर चालू महिन्यात संदेश गायकवाड, रवींद्र पाटील, राजू कुदळे, सुरेश सूर्यवंशी, शांतीलाल कोळी व विनोद पाटसकर हे कोरोनामुळे मृत्यूच्या दाढेत सापडले.

प्रत्येक पोलीस ठाण्यात अधिक दक्षता
सध्या कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड सुरू असल्याने एखाद्या लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीकडून इतरांना संसर्ग होण्याचा जास्त धोका आहे.
त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यात व बंदोबस्त दरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षेची खबरदारी घेतली जात आहे.
त्यानंतरही अवघ्या तीन महिन्यांत नऊ पोलिसांच्या निधनाने नवी मुंबई पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

Web Title: Nine policemen killed in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.