पुस्तकांसाठी नववीच्या विद्यार्थ्यांची शोधाशोध
By admin | Published: June 18, 2017 02:10 AM2017-06-18T02:10:01+5:302017-06-18T02:10:01+5:30
यंदा इयत्ता नववीच्या अभ्यासक्र मात बदल झाला आहे. शाळा आणि पुस्तकविक्रेत्यांकडे पुस्तके उपलब्ध होण्यास किमान आठवड्याभराचा कालावधी लागणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : यंदा इयत्ता नववीच्या अभ्यासक्र मात बदल झाला आहे. शाळा आणि पुस्तकविक्रेत्यांकडे पुस्तके उपलब्ध होण्यास किमान आठवड्याभराचा कालावधी लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणता अभ्यासक्र म शिकवावा, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. दरम्यान, खारघरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पनवेलच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन त्वरित पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी केली आहे.
२०१७-१८ शैक्षणिक वर्षापासून इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने नव्या अभ्यासक्र माची पुस्तके जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होतील, अशी माहिती बालभारतीच्या संचालकांनी मे महिन्यात शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली होती. १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. पालकवर्ग दोन दिवसांपासून परिसरातील सर्व पुस्तकविक्रेत्यांकडे पुस्तकांसाठी शोधाशोध करीत आहेत. अद्याप बाजारातच पुस्तके उपलब्ध झाली नसल्याने खारघरमधील दोन पुस्तकविक्रेत्यांच्या दुकानात चौकशी केली असता पुस्तक यायला एक आठवडा लागेल, असे सांगण्यात आले. शाळा सुरू झाल्या; परंतु पुस्तकविक्रे त्यांकडे पुस्तके उपब्लध नसल्याने शिवसेनेचे पदाधिकारी रामचंद्र देवरे, आप्पा वारंग, संतोष गुजर, सुमित निगडे आणि सचिन महाडिक आदी शिष्टमंडळाने, पनवेलच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे त्वरित पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी केली आहे. पुस्तकेच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना काय शिकवावे अणि नेमका कसला अभ्यास करावा, असा प्रश्न शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना पडला आहे.
पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व वर्गांतील पुस्तके वितरण करण्यात आली आहेत. नववीची पुस्तके अद्यापही उपलब्ध झाली नाहीत. लवकर उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- नवनाथ साबळे,
गटशिक्षणाधिकारी, पनवेल विभाग