नवी मुंबई : समविचारी संघटनांच्या वतीने निर्भय बनो ची हाक देण्यात आली आहे. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात गुरुवार २९ जून रोजी सकाळी साडेदहा ते एक दरम्यान पार पडणाऱ्या विशेष संवाद कार्यक्रमप्रसंगी प्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे, सामाजिक राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी आणि लेखक, सलोखा- सहिष्णुता पुरस्कर्ते प्रमोद मुजुमदार यावेळी आपले विचार मांडणार आहेत.
आज देशात सामाजिक राजकीय सांस्कृतिक वातावरण ढवळून निघत आहे. यात सद्यस्थितीचं राजकारण हे कधी नव्हे इतकं असहिष्णु आणि आक्रमक झालं आहे. त्यामुळे समाज जीवनाची बाकीची अंगं समाजकारण, संस्कृती, शिक्षण, अर्थकारण ही विशविशीत होताना दिसतात. लोकशाही ही आपल्या देशाची प्राणशक्ती आहे. पण तिचे खच्चीकरण करायचं काम सध्या सुरू आहे. तसेच एक देश ,एक भाषा, एक धर्म, च्या दिशेने ही वाटचाल सुरू आहे. ज्या महामानवांनी आपलं रक्त सांडून आणि आटवून देश स्वतंत्र केला व संविधानाच्या भक्कम पायावर उभा केला, त्यांच्या विचारांची आपल्या डोळ्यांदेखत मोडतोड चालू आहे.
एकाधिकारशाही म्हणजेच हुकूमशाहीकडे निघालेली ही वाटचाल आपण रोखली नाही तर गांधी, नेहरू ,फुले ,शाहू ,आंबेडकर यांचा पराभव करण्यात आपण देखील वाटेकरी होऊ. हे होऊ द्यायचं नसेल तर समविचारी संघटनांच्या वतीने निर्भय बनो हाक देण्यात आली आहे. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात गुरुवार २९ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता संपन्न होणाऱ्या या संवाद कार्यक्रमात विधिज्ञ असीम सरोदे, सामाजिक राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी, आणि लेखक प्रमोद मुजुमदार यावेळी आपले विचार व्यक्त करणार आहेत. नवी मुंबईकर जनतेने या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन निर्भय बनो परिवार आणि समविचारी संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे.