नेरुळमध्ये रंगला सखी सन्मान सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 11:08 PM2019-07-21T23:08:15+5:302019-07-21T23:08:50+5:30
विविध क्षेत्रातील महिलांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल परिसरातून शेकडोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
विविध क्षेत्रात कार्यरत महिलांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ‘लोकमत’चा नेहमीच सकारात्मक प्रयत्न राहिला आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी नेरुळ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नवी मुंबईसह मुंबई आणि ठाणे येथील आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, उद्योग तसेच कलाक्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा ‘लोकमत’ सखी सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला महिलांनी मोठी गर्दी केली होती. भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज, सिनेअभिनेत्री धनश्री काडगावकर तसेच अभिनेत्री अदिती गोवित्रीकर हे या कार्यक्रमांचे विशेष आकर्षण ठरल्या, तसेच कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या बहारदार नृत्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
महिलांच्या सन्मानासाठी पुरुषही सरसावले
विविध क्षेत्रातील महिलांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल परिसरातून शेकडोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरुषांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती
या पुरस्कार सोहळ्यास विकासक प्रकाश बाविस्कर, शशी यादव, अमरदीप सिंग, किरण राजपूत, जाफर पिरजादा, प्रीती सिंग, शिवानी नेमवरकर, दीपक शेट्टी, मंगेश परुळेकर, डॉ. राजेश मढवी आदी उपस्थित होते.
विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांच्या सत्काराचे महत्त्वपूर्ण कार्य ‘सखी सन्मान’ सोहळ्याच्या माध्यमातून झाले. विजय नाहटा फाउंडेशनतर्फे महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये आरोग्य तपासणीसह आत्मसंरक्षणाचे धडेही दिले जातात. आजवर विविध क्षेत्रात ज्या महिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे, त्यांनीही या देशाच नाव जगभरात उंचीवर नेवून ठेवले आहे, यामुळे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांचा सन्मान झालाच पाहिजे. - विजय नाहटा, शिवसेना उपनेते तथा अध्यक्ष, विजय नाहटा फाउंडेशन