निवारा ट्रस्टचा नवी मुंबईकरांनाही दणका; लखपती होण्याचा मोह पडला महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 09:27 AM2023-08-08T09:27:49+5:302023-08-08T09:28:12+5:30
नवी मुंबईतील एपीएमसी आवारात हा प्रकार घडला आहे. निवारा ट्रस्टच्या नावाखाली काहीजण एपीएमसी आवारात फिरत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : निवारा ट्रस्टमध्ये गुंतवणूक करून १८ महिन्यांत लाखो रुपये कमवण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या ट्रस्टवर यापूर्वी कोल्हापुरातही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
नवी मुंबईतील एपीएमसी आवारात हा प्रकार घडला आहे. निवारा ट्रस्टच्या नावाखाली काहीजण एपीएमसी आवारात फिरत होते. त्यांनी ट्रस्टमध्ये ६ हजार रुपयांची गुंतवणूक करून १८ महिन्यांत २९ लाख ६६ हजार रुपये मिळतील, असे अनेकांना सांगितले. त्यासाठी निवारा ट्रस्टचे पुण्यात मोठे प्रस्थ असून देश, विदेशातून निधी मिळत असतो. त्यातून सामाजिक कार्य केले जाते असे नागरिकांना सांगण्यात येत होते.
अनेक महिन्यांपासून या व्यक्ती नागरिकांना विश्वासात घेऊन गुंतवणूक करून घेत होत्या. प्रत्यक्षात मात्र ही ट्रस्ट बनावट असून त्यांच्यावर कोल्हापूरमध्ये यापूर्वी फसवणुकीचे गुन्हेही दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. एपीएमसी आवारात त्यांनी पंडित गाडगे, कल्पना गवंडे, सुखदेव डोके, विलास डोके, शिवाजी गुरव, आनंदराव डाकवाले, विक्रांत डोके व चंद्रकांत डोके यांच्यासह इतर अनेकांकडून ६ हजार ते त्याहून अधिक रक्कम गुंतवणूक करून घेतली होती. त्यापैकी काहींचे नुकतेच १८ महिने पूर्ण झाल्याने ते नफ्याची रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
मुंबईतही अनेकांची झाली फसवणूक
याप्रकरणी त्यांनी एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली असता काशिनाथ जाधव, रमेश घाटगे, संतोष तोडकर, दीपाली पतंगे व पूजा भोसले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी मागील काही दिवसात नवी मुंबईसह मुंबईतदेखील अनेकांना गंडा घातल्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.