महापालिकेची बदनामी खपवून घेणार नाही
By admin | Published: November 9, 2016 04:14 AM2016-11-09T04:14:47+5:302016-11-09T04:14:47+5:30
महापालिकेने २४ वर्षांमध्ये देशभर नावलौकिक मिळविला, परंतु घोटाळ्यांच्या अफवा पसरवून तुम्ही पाच महिन्यांत शहर बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरू केले आहे
नवी मुंबई : महापालिकेने २४ वर्षांमध्ये देशभर नावलौकिक मिळविला, परंतु घोटाळ्यांच्या अफवा पसरवून तुम्ही पाच महिन्यांत शहर बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरू केले आहे. आम्ही घोटाळ्यांना कधीच पाठीशी घातले नाही व यापुढेही घालणार नाही, पण फक्त अफवा पसरवून महापालिकेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर सहन केले जाणार नाही, असा इशारा शिवसेना, राष्ट्रवादी व काँगे्रसच्या नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये दिला असून आयुक्तांसह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव आणल्यापासून नवी मुंबई महापालिका भ्रष्टाचारी असल्याची प्रतिमा निर्माण केली जात आहे. याचे तीव्र पडसाद मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये उमटले. सभागृह नेते जयवंत सुतार यांनी प्रशासनाला धारेवर धरले. २४ वर्षांपूर्वी जेमतेम १८ कोटी रुपये उत्पन्न असलेल्या महापालिकेचा अर्थसंकल्प २ हजार कोटींवर गेला. स्वत:च्या मालकीचे धरण विकत घेतले. रस्ते व्हिजन, स्कूल व्हिजनसह केलेल्या कामांची देशपातळीवर दखल घेतली. आम्ही २४ वर्षांमध्ये जे कमविले ते पाच महिन्यांत तुम्ही धुळीस मिळविले. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रकल्पग्रस्तांना केले जात आहे. गावातील घरांना बांधकाम परवानगी देण्याचे खोटे आश्वासन दिले जात आहे. अफवा तुम्ही पसरविता. नागरिकांच्या भावना तुम्ही दुखविता व असंतोष वाढला की त्याचे खापर लोकप्रतिनिधींवर फोडून मोकळे होत आहात. मालमत्ता कर विभागात हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे चित्र रंगविले जात आहे. अनियमितता की भ्रष्टाचार ते स्पष्ट करा. तुम्हाला कोणी रोखले नाही. बिनधास्त कारवाई करा, पण खोट्या अफवा पसरवून संस्था बदनाम करू नका, असा स्पष्ट इशारा सुतार यांनी प्रशासनास दिला.
राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेविका शुभांगी पाटील यांनीही प्रशासनाच्या ग्रामस्थांविषयीच्या दुटप्पी भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. ८ अ चा उतारा असेल तर बांधकाम परवानगी देण्याचे सांगितले जात आहे, मग तुर्भेमध्ये कारवाईसाठी कसे आलात असा जाब विचारला. दत्तमंदिरजवळ ग्रामस्थांना रस्त्यावर उतरण्याची वेळ का आली? नवी मुंबई शहर, महापालिका व प्रकल्पग्रस्तांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नका, ते आम्ही कधीही सहन करणार नाही असे स्पष्ट शब्दात सुनावले. शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी यांनीही प्रशासनावर ताशेरे ओढले.
सुरवातीला आम्ही तुमच्या चांगल्या कामगिरीचे स्वागत केले. पण तुम्ही शहरच बदनाम करीत आहात. स्थायी समिती व महासभेला अंधारात ठेवून कामे करीत आहात. लोकप्रतिनिधींची प्रतिमा खराब केली जात आहे. प्रशासनाविषयी कोणी टीका केली की त्यांच्यावर आकसाने कारवाई केली जात आहे. सभापती शिवराम पाटील यांचीही बदनामी केली असून त्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)
१एक महिन्यापासून महापालिकेवर सातत्याने घोटाळ्याचे आरोप होत आहेत. मालमत्ता कर विभागात १ हजार कोटीचा घोटाळा झाला आहे का याचा जाब विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना उपआयुक्त उमेश वाघ यांनी स्पष्टीकरण दिले. जवळपास तीन हजार मालमत्तांना बिले दिलीच नाहीत. जुनी थकबाकी तपासली असता जवळपास ९८१ कोटींपेक्षा जास्त थकबाकी निदर्शनास आली आहे.
२अनेक मालमत्तांना बिलेच दिली नाहीत व इतर अनेक उणिवा आढळून आल्याचे सांगितले. पण हा घोटाळाच असल्याचे स्पष्ट सांगितले नाही. लोकप्रतिनिधींनी धारेवर धरण्यास सुरवात केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. अखेर पुढील आठवड्यात सर्व तपशील देण्याचे सांगून वेळ मारून नेण्यात आली.
महापालिकेची प्रतिमा पाच महिन्यांत खराब करण्याचेच काम झाले आहे. नियमांची भाषा करून नियमबाह्य कामे प्रशासनाकडून होत आहेत. स्थायी समिती व महासभेच्या अधिकारांवर गदा आणली जात आहे. प्रशासन स्वत:च अफवा पसरवत असून शहराची बदनामी तत्काळ थांबविण्यात यावी.
- जयवंत सुतार,
सभागृह नेते.
भ्रष्टाचाराला आम्ही कधीच पाठीशी घातलेले नाही व पुढेही घालणार नाही. प्रशासनाच्या चांगल्या कामाचे नेहमी स्वागत केले आहे, पण चुकीच्या कामांना पाठीशी घातले जाणार नाही. घोटाळ्यांच्या पुड्या सोडून कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका.
- एम. के. मढवी, ज्येष्ठ नगरसेवक
तुर्भेमधील प्रकल्पग्रस्तांकडे ८ अ चा उतारा असतानाही त्यांचे घर पाडण्यासाठी पालिका अधिकारी आले होते. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना रस्त्यावर उतरावे लागले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. यापुढे भूमिपुत्रांची होणारी दिशाभूल आम्ही खपवून घेणार नाही.
- शुभांगी पाटील, नगरसेविका राष्ट्रवादी
महापालिकेची व येथील लोकप्रतिनिधींची बदनामी करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. कोणी आवाज उठविला की त्यांना अडचणीत आणले जात आहे. घोटाळ्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. प्रशासनाला घोटाळे बाहेर काढण्यापासून कोणी रोखले नाही. तुमच्या कामात हस्तक्षेप केलेला नाही, पण चुकीच्या पद्धतीने काम करून शहर बदनाम केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. - शिवराम पाटील, सभापती, स्थायी समिती