पनवेल : पनवेल महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील १५० प्राप्त हरकती आणि सूचनांवर निवडणूक आयोगामार्फत मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. अंतिम प्रभाग रचना १५ फेब्रुवारी 2017 रोजी जाहीर होईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. पनवेल येथील आद्य क्र ांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात हरकती आणि सुचनांवर सुनावणी घेण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले अधिकारी डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांच्यासमोर ही सुनावणी घेण्यात आली. यावेळी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, महापालिकेचे उपायुक्त मंगेश चितळे उपस्थित होते. सुनावणीची वेळ साडेअकराची होती, मात्र साडेदहापासूनच हरकती आणि सूचना घेणाऱ्यांची गर्दी झाली होती. काही नागरिकांनी वकीलांची फौज सोबत आणली होती. आयुक्त शिंदे यांनी ही सुनावणी खासगी स्वरूपात घेण्यात येईल, असे सांगितल्यावर जाहीरपणे सुनावणी घेण्याची मागणी काहींनी केली. पण प्राधिकृत अधिकारी बागडे यांनी त्यास नकार दर्शविला आणि बंद खोलीत हरकती घेतल्या. प्राप्त हरकतींपैकी सर्वाधिक हरकती प्रभाग १४ मधून होत्या. त्यामुळे येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रभाग रचना करण्यात न आल्याचा आरोप करत मुस्लिम समाजाचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मुस्लिम बहुल भाग फोडल्याचे आरोप यावेळी करण्यात आला. प्रभाग १८ मधील खांदा वसाहतीमधील सेक्टर १२ हा भाग वगळून तो प्रभाग १४ किंवा १५ मध्ये समाविष्ठ करण्यात यावा, मुस्लिम भाग पूर्णपणे प्रभाग १४ मध्ये टाकण्यात यावा, कळंबोली वसाहतीमधील सेक्टर २ ई व ३ ई हा प्रभाग १० मध्ये घेण्यात यावा, अशा हरकती घेण्यात आल्या. प्रभाग रचना करताना नैसर्गिक हद्दीचे उल्लंघन केल्याच्या जास्त हरकती होत्या. आयोगाने निश्चित केलेल्या कार्यक्र मानुसार हरकतींवरील सुनावणीवर निर्णय घेऊन, बागडे यांना ४ फेब्रुवारी २०१७ पर्यंत अंतिम प्रभाग रचनेचा अहवाल आयोगाला सादर करायचा आहे. त्यात प्रभाग रचनेतील बदल, त्याचा फायदा नेमका कोणाला? याबाबत उत्सुकता आहे. महापालिका हद्दीतून रचना, आरक्षण आदी विषयावर प्रशासनाकडे ४९ पद्धतीच्या पण १५० आक्षेप व हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. सुनावणीसाठी नगरपरिषदेचे आजी माजी सदस्य, पदाधिकारी व राजकीय नेतेमंडळी एकत्र आले होते.
महापालिकेच्या हरकती, सूचनांवर जनसुनावणी
By admin | Published: January 25, 2017 5:03 AM