पालिकेने केला बाजार समितीत प्लॅस्टीक साठा जप्त, ४० हजार रुपये दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 02:07 AM2021-01-31T02:07:30+5:302021-01-31T02:08:17+5:30
plastic ban : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये महानगरपालिकेच्या पथकाने पहाटे छापा टाकला. मार्केटमधून ८०० किलोपेक्षा जास्त वजनाच्या प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या असून, ४० हजार रुपये दंड वसूल केला आहे.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये महानगरपालिकेच्या पथकाने पहाटे छापा टाकला. मार्केटमधून ८०० किलोपेक्षा जास्त वजनाच्या प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या असून, ४० हजार रुपये दंड वसूल केला आहे.
पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरात प्लॅस्टिकचा वापर करणारांवर कडक कारवाई करण्याचा आदेश प्रशासनाला दिला. प्लास्टिकमुक्त शहर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रशासनानेही कारवाईचा धडाका सुरू केला आहे. तुर्भेचे विभाग अधिकारी सुबोध ठाणेकर यांच्या पथकाने पहाटे तीन वाजता बाजार समितीच्या भजी मार्केटमध्ये छापा टाकला. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले. सकाळी नऊ वाजेपर्यंत ही मोहीम सुरू होती. प्लॅस्टिकचा साठा जप्त करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली.
शहरातील प्रत्येक विभागात प्लॅस्टिक विरोधात अभियान राबविण्यात येणार आहे. नागरिक व दुकानदारांनीही प्लॅस्टिक वापर टाळावा. सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.