नवी मुंबई : नेरुळ येथे एनएमएमटी बसला आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. घटने वेळी बसमध्ये ६० प्रवासी होते. वेळीच त्यांना बसमधून खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.नेरुळ स्थानकाच्या पश्चिमेकडील मार्गावर रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. एनएमएमटीची २० क्रमांकाची बस (एमएच ४३ एच ५४४८) कोपरखैरणेकडून करावेच्या दिशेने चालली होती. या वेळी बसमध्ये सुमारे ६० प्रवासी होते. बस नेरुळ स्थानकालगत आली असता, टायर फुटल्याचा आवाज झाला. यामुळे चालकाने बस जागीच थांबवली असता, बसच्या खाली आग लागल्याचे निदर्शनास आले. यामुळे बसच्या चालक-वाहकाने प्रसंगसावधानता राखत बसमधील प्रवाशांना तत्काळ खाली उतरवले. त्यानंतर काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच, नेरुळ अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सुमारे १५ मिनिटे प्रयत्न केल्यानंतर बसची आग विझली; परंतु तोपर्यंत बस जळून पूर्णपणे खाक झाली होती. या घटनेची माहिती मिळताच, परिवहन समिती सभापती प्रदीप गवस, नगरसेवक अशोक गावडे, सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. रहदारीच्या मार्गावरच घडलेल्या या प्रकारामुळे तिथली वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर सुमारे एका तासाने आग आटोक्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. आगीचे ठोस कारण मात्र कळलेले नसून, बस एक वर्षापूर्वीच एनएमएमटीच्या ताफ्यात आल्याचे परिवहन व्यवस्थापक शिरिष आरदवाड यांनी सांगितले.
एनएमएमटी बसला आग, दुर्घटना टळली, ६० प्रवाशांचे वाचले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 7:04 AM