नवी मुंबई : पावसाळा सुरू होऊनही एनएमएमटीच्या गाड्यांना वायपर नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात वायपरअभावी अनेक बस अर्ध्या प्रवासातून आगारात न्याव्या लागल्या. या प्रकारावरून एनएमएमटीच्या अभियांत्रिकी विभागाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त होत आहे.सोमवारी रात्रीच्या सुमारास शहरात जोराच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. या दरम्यान रेल्वेचाही खोळंबा झाल्याने शहरातील प्रवाशांना निश्चित ठिकाणी सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी बेस्ट व एनएमएमटी प्रशासनावर आली होती. नेमक्या त्याच वेळी एनएमएमटीच्या बस आगारात जमा करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली होती. केवळ वायपर नसल्याने विविध मार्गांवरील २८ बस अर्ध्या मार्गातून परत आगारात आल्या. याचा फटका परिवहनच्या नियमित प्रवाशांना बसला आहे. पावसाळा सुरू झाल्याची चाहूल काही दिवसांपूर्वीच लागलेली असतानाही एनएमएमटीच्या बहुतांश गाड्यांवर वायपर बसवण्यात आलेले नाहीत. यामुळे सोमवारी रात्री मुसळधार पाऊस पडताच, चालकांना रस्त्यावरील परिस्थिती पाहण्यास अडथळा निर्माण झाला होता. वायपर नसल्याने बस चालवताना काचेवरून वाहणारे पाणी हटवायचे कसे? असा प्रश्न त्यांना पडला होता. तर रात्रीच्या काळोखात वायपरअभावी रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचीही शक्यता होती. त्यामुळे या बस प्रवासाचा टप्पा पूर्ण न करता, प्रवाशांना अर्धवट मार्गात सोडावे लागले.वायपर नसलेल्या बसएम.एच. ४३. बीजी. २४५५, एम.एच. ४३. बीजी.२४५६, एम.एच. ४३. एच. ५४७१, एम.एच. ४३. एच. ५४६४, एम.एच. ४३. एच. ५४६७, एम.एच. ४३. एच. ५४६१, एम.एच. ४३. एच. ५४१९, एम.एच. ४३. एच. ५४५० व इतर.
वायपरअभावी एनएमएमटीच्या बस आगारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 3:13 AM