सानुग्रह अनुदान वेळेत देण्यात एनएमएमटीला अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 02:41 AM2018-11-14T02:41:25+5:302018-11-14T02:41:48+5:30
११५ कर्मचाऱ्यांना कमी अनुदान : पुरेसा निधी नसल्याचा कर्मचाऱ्यांना फटका
नवी मुंबई : महानगरपालिका परिवहन उपक्रमातील ११५ कर्मचाऱ्यांना वेळेत सानुग्रह अनुदानाची रक्कम देण्यात प्रशासनास अपयश आले आहे. मंजूर झालेल्या २३ हजार रुपयांपैकी फक्त १२ हजार रुपयेच दिवाळीपूर्वी देण्यात आले आहेत. पुरेसा निधी नसल्याचा फटका सहायक वाहतूक निरीक्षक ते आगार व्यवस्थापक पदावर काम करणाºयांना बसला आहे.
राज्यात सर्वात प्रथम सानुग्रह अनुदान मंजूर करणारी व प्रत्यक्ष कर्मचाºयांना देणारी महानगरपालिका म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक आहे; परंतु पालिकेच्या परिवहन उपक्रमाने या परंपरेला छेद दिला आहे. उपक्रमाने अस्थापनेवरील कर्मचाºयांना २३ हजार रुपये व कंत्राटी कामगारांना १७ हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले होते. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती; परंतु प्रत्यक्ष अनुदान देण्याच्या कालावधीमध्ये पुरेसा निधी नसल्याचे निदर्शनास आले, यामुळे प्राधान्यक्रमाने चालक व वाहकांना दिवाळीपूर्वीच अनुदानाची रक्कम देण्यात आली.
सहायक वाहतूक निरीक्षक, वाहतूक निरीक्षक, कार्यालयीन अधीक्षक, सहायक वाहतूक अधीक्षक, वाहतूक अधीक्षक, आगार व्यवस्थापक पदावर असलेल्या जवळपास ११५ कर्मचाºयांना दिवाळीमध्ये फक्त १२ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे.
उर्वरित ११ हजार रुपये पुरेसा निधी जमा झाल्यानंतर दिले जातील, असे सांगण्यात आले. वास्तविक सानुग्रह अनुदान दिवाळीमध्ये मिळणे आवश्यक आहे. प्रशासनाने त्याविषयी आर्थिक तरतूद अगोदरच करून ठेवणे आवश्यक आहे; पण योग्य नियोजन झाले नसल्यामुळे या अधिकारी व कर्मचाºयांना वेळेत सानुग्रह अनुदान मिळू शकले नाही, याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सानुग्रह अनुदान दिवाळीमध्ये देणे आवश्यक आहे, त्यासाठीचे आर्थिक नियोजन करणे ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे; पण नियोजनाच्या अभावामुळे अनेक कर्मचाºयांना ५० टक्केच अनुदान उपलब्ध झाले. यापूर्वी वार्षिक वेतनवाढीसाठीही अशीच दिरंगाई झाली होती.
- शहाजी शिंदे,
संयुक्त सरचिटणीस,
कर्मचारी कामगार सेना
एनएमएमटी अधिकारी व कर्मचाºयांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली होती. परिवहन समितीने वेळेत अनुदान मंजूर केले होते. दिवाळीपूर्वीच पगार व अनुदान सर्वांना देणे आवश्यक होते; परंतु प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अनेक कर्मचाºयांना दिवाळीत पूर्ण अनुदान उपलब्ध होऊ शकले नाही.
- समीर बागवान,
परिवहन समिती सदस्य
परिवहन उपक्रमाने सर्व अधिकारी व कर्मचाºयांना दिवाळीनिमित्त १ तारखेलाच वेतन दिले आहे. चालक व वाहकांना पूर्ण सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वीच दिले आहे. निधी नसल्यामुळे काही अधिकारी व कर्मचाºयांना अर्धे अनुदान दिले होते. उर्वरित रक्कम बुधवारी त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे.
- नीलेश नलावडे,
मुख्य वित्त व लेखा अधिकारी, एनएमएमटी