एनएमएमटीची भाडेवाढ

By admin | Published: June 9, 2015 01:14 AM2015-06-09T01:14:05+5:302015-06-09T01:14:05+5:30

परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतरही विविध कारणांमुळे मागील वर्षभरापासून रखडलेल्या एनएमएमटीच्या भाडेवाढीबाबत व्यवस्थापनाने पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्या आहेत.

NMMT fare hike | एनएमएमटीची भाडेवाढ

एनएमएमटीची भाडेवाढ

Next

नवी मुंबई : परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतरही विविध कारणांमुळे मागील वर्षभरापासून रखडलेल्या एनएमएमटीच्या भाडेवाढीबाबत व्यवस्थापनाने पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्या आहेत. पुढील आठवडाभरात संबंधित विभागाकडून त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता व्यवस्थापनाने वर्तविली आहे. ही मंजुरी मिळताच तातडीने भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.
अपुरा कर्मचारीवर्ग व नियोजनशून्य कारभारामुळे नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाला (एनएमएमटी) दरमहा सुमारे अडीच कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहन व्यवस्थापनाने गेल्या वर्षी तिकीट दरात वाढ करण्याचे प्रस्तावित केले होते. परिवहन प्राधिकरणाने लोकसभा निवडणुकी अगोदर त्याला मंजुरी दिली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच दुसऱ्या दिवसापासून ही भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला होता. मात्र विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भाडेवाढ स्थगित ठेवण्यात आली होती. आता महापालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे मागील दीड वर्षापासून रखडलेली भाडेवाढ करणे क्रमप्राप्त झाले आहे.
परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात सध्या डिझेलवर चालणाऱ्या १४५ बस, २ मिनी बस, वातानुकूलित व्होल्वो ३० आणि सीएनजीवर चालणाऱ्या १६१ अशा एकूण ३३८ बसेस आहेत. यापूर्वी २५ सप्टेंबर २०१२ रोजी तिकीट दरात वाढ केली होती. त्यामुळे भाडेवाढीच्या जुन्या प्रस्तावाला नव्याने मंजुरी मिळावी यासाठी व्यवस्थापनाने प्रयत्न चालविले आहेत. (प्रतिनिधी)

मागील दीड-दोन वर्षांत इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे तिकिटांचे दर वाढविणे अपरिहार्य झाले आहे. भाडेवाढीचा नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. असे असले तरी विविध स्तरावर मंजुरी मिळविण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाकडे पडून असलेल्या भाडेवाढीच्या जुन्याच प्रस्तावाला मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या आठवडाभरात त्यास मान्यता मिळण्याची शक्यता आहे. -शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, परिवहन उपक्रम

Web Title: NMMT fare hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.