एनएमएमटीकडे ४० सीएनजी बसेस; केंद्र शासनाच्या योजनेतून होणार खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 12:25 AM2020-01-18T00:25:25+5:302020-01-18T00:25:44+5:30
बसेसची खरेदी ठेकेदार करणार असून महापालिका प्रतिकिलोमीटर ५०.४८ रुपये प्रमाणे त्यांना मोबदला देणार आहे.
नवी मुंबई :इलेक्ट्रिक बसेसनंतर महापालिकेने ४० सीएनजी बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी वाहतूक व्यवस्थेच्या खासगी सहभागाअंतर्गत या बसेस खरेदी करण्यात येणार असून या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमात सध्या ५०० बसेसद्वारे सेवा देण्यात येत आहे. तथापि, सदर बसेसमधून कालबाह्य झालेल्या ५० बसेस भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वर्षभरात १०० अशा एकूण १५० बसेस १० वर्षांपेक्षा जास्त जुन्या असून त्या निर्लेखित केल्या जाणार आहेत. यामुळे महापालिकेने १०० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून आता त्यामध्ये ४० सीएनजी बसेसचाही समावेश होणार आहे. केंद्र शासनाच्या योजनेतून ठेकेदाराच्या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत. सर्व बसेस महापालिकेने निश्चित केलेल्या मार्गावर चालविण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली जाणार आहे. बसेसची खरेदी, दुरुस्ती, चालक, इंधन, विमा, साफसफाईचा खर्च ठेकेदार करणार आहे. वाहक व पर्यवेक्षकीय अधिकारी ही परिवहन उपक्रमाची जबाबदारी असणार आहे. बसेसच्या माध्यमातून प्राप्त होणारा महसूल हा उपक्रमाने जमा करावयाचा असून ठेकेदारास प्रति किलोमीटरप्रमाणे शुल्क अदा करावयाचे आहे. बसेसवरील जाहिरातीपासून मिळणारे उत्पन्न परिवहन उपक्रमाचे असणार आहे.
बसेसची खरेदी ठेकेदार करणार असून महापालिका प्रतिकिलोमीटर ५०.४८ रुपये प्रमाणे त्यांना मोबदला देणार आहे. वार्षिक जवळपास १६ कोटी ४८ लाख रुपये खर्च होणार आहे. याशिवाय वाहकाच्या वेतनासाठी महिन्याला २३ लाख रुपये खर्च करावे लागणार असून सर्वसाधारण सभेने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.
बससेवा सुरू करण्यासाठी पालिकेची जबाबदारी
- बसेस पार्किंग व कार्यशाळेकरिता जागा उपलब्ध करून सर्व सुविधांयुक्त आगार उपलब्ध करून द्यायची आहे.
- बसमार्ग व बसचे वेळापत्रक निश्चित करण्याची जबाबदारी परिवहनची असणार आहे.
- तिकीट दर निश्चित करण्याची जबाबदारीही पालिकेची असेल.
- बस मार्गाचे संबंधित सर्व परवाने परिवहनने प्राप्त करावयाचे आहेत.
महत्त्वाच्या अटी
कंत्राटाचा कालावधी दहा वर्षांचा असणार आहे. बसेसचे सुटे भाग व दुरुस्ती, अपघात दुरुस्तीचे काम ठेकेदार स्वत: करेल. बसेसवरील जाहिरातीचे हक्क परिवहनकडे असणार आहेत. शासकीय कर भरण्याची जबाबदारीही ठेकेदाराची असणार आहे.