एनएमएमटीच्या ताफ्यात २० नव्या गाड्या दाखल
By admin | Published: April 6, 2016 04:24 AM2016-04-06T04:24:18+5:302016-04-06T04:24:18+5:30
महापालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात नव्या २० मिडी बस दाखल झाल्या आहेत. केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत परिवहनला या बस मिळालेल्या आहेत.
नवी मुंबई : महापालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात नव्या २० मिडी बस दाखल झाल्या आहेत. केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत परिवहनला या बस मिळालेल्या आहेत. लवकरच या बस विविध मार्गांवर सुरू करून ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना सुखद अनुभव देण्याचा परिवहनचा प्रयत्न आहे.
नवी मुंबईकरांचा प्रवास सुखद करण्यासाठी एनएमएमटी प्रशासन सातत्याने प्रयत्नात आहे. त्याकरिता विभागांतर्गतच्या मार्गावर रिंग रूट बससेवा देखील सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु सद्य:स्थितीत शहरातल्या विविध मार्गांवर धावणाऱ्या एनएमएमटीच्या अनेक गाड्या नादुरुस्त स्थितीतल्या असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बहुतांश गाड्यांचे मार्ग फलक तुटलेले असून बसमधील आसन व्यवस्थाही डबघाईला आलेली आहे. काही महत्त्वाच्या मार्गांवर धावणाऱ्या बसमधून क्षमतेपेक्षाही जादा प्रवाशांची वाहतूक होत असल्याने त्या बस एकाच बाजूला झुकल्याचे पाहायला मिळते. यामुळे परिवहनच्या गाड्यांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाणही अधिक आहे. परिणामी तिकीटदर कमी असूनही अनेक प्रवासी एनएमएमटीने प्रवास करण्याला टाळाटाळ करतात. परिवहनतर्फे नुकताच बस डे देखील साजरा करण्यात आला होता. त्यावेळी देखील प्रवाशांचा एनएमएमटीला अल्प प्रतिसाद लाभला होता.
परंतु ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना सुखद प्रवासाचा आनंद देण्याचा प्रयत्न एनएमएमटीचा आहे. एनएमएमटीच्या ताफ्यात २० नव्या बस दाखल झाल्या आहेत. केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत परिवहनला या बस मिळाल्या आहेत. घणसोली येथील आगारात गेल्या चार दिवसांपासून या बस उभ्या आहेत. आरटीओकडून त्यांचे पासिंग होऊन नंबर मिळणे अद्याप बाकी आहे. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर त्या बस विविध मार्गांवर सुरू केल्या जातील, असे परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सांगितले. परिवहनतर्फे अद्याप कोणताही नवा मार्ग विचाराधीन नसल्याने सध्याच्या मार्गावरील जुन्या गाड्यांऐवजी नव्या गाड्या धावणार आहेत. परंतु आरटीओच्या प्रक्रियेला अद्याप १० ते १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित असल्याने त्यानंतरच या नव्या गाड्यांमध्ये बसण्याचा आनंद नवी मुंबईकरांना मिळणार आहे.
(प्रतिनिधी)