-सूर्यकांत वाघमारे।नवी मुंबई : महापालिकेचा परिवहन उपक्रम अगोदरच तोट्यात असताना लॉकडाउनमुळे महिन्याला नऊ कोटींची झळ सोसावी लागत आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बस धावत असल्याने व प्रवासी वाहतूक बंद असल्याने उत्पन्न पूर्णपणे थांबल्याने परिवहनला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.नवी मुंबई महापालिकेचा परिवहन उपक्रम अनेक वर्षांपासून तोट्यात आहे. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी असल्याने आर्थिक समीकरणे जुळून येत नसल्याने उपक्रमाला तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी, दरवर्षी महापालिकेच्या निधीवर या उपक्रमाला अवलंबून राहावे लागते.शहरातील अवैध प्रवासी वाहतूक, रिक्षा व बेस्ट बस यामुळे अनेक मार्गांवर एनएमएमटीला अपेक्षित असा प्रवासी प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळेमहिना सहा कोटींपर्यंतचा आर्थिक फटका परिवहनला बसत आहे. तो सहन करून उपक्रम चालवला जात असतानाच दोन महिन्यांपासून लॉकडाउनमुळे एनएमएमटीची प्रवासीवाहतूक ठप्प आहे. तर केवळ अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठी ठरावीक मार्गावर बस चालवल्या जात आहेत.एप्रिल महिन्यात केवळ १७ लाखांचे उत्पन्न परिवहनच्या पदरी पडले. लॉकडाउनपूर्वी परिवहनला महिना साधारण नऊ ते दहा कोटी उत्पन्न मिळत होते; परंतु दोन महिन्यांपासून प्रवासीवाहतूक बंद असल्याने परिवहनच्या उत्पन्नाचे चाक लॉकडाउनच्या गाळात रुतले आहे. तर आणखी किती काळ बससेवा बंद राहील, याचेही चित्र स्पष्ट नाही.परिवहनच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने प्रवासी संख्या कशी वाढेल यावर सतत भर दिला जातो. त्यानंतरही ठरावीक मार्ग वगळता इतर मार्गावर एनएमएमटीची प्रवासी संख्या वाढू शकलेली नाही. लॉकडाउनमुळे एनएमएमटीच्या तिजोरीला पडलेले भगदाड भरून काढण्यासाठी पुढील कित्येक महिने कसरत करावी लागणार आहे.महिनाभरात १३ लाख उत्पन्नपरिवहनच्या कर्मचाऱ्यांचे वेतन सुरूच असून गतमहिन्यात त्यावर सहा कोटी ८८ लाख रुपये खर्च झाला आहे. तर इतर खर्च मिळून एकूण नऊ कोटी १६ लाख रुपये खर्चाचा भार परिवहनवर पडला आहे. उत्पन्न अवघे १७ लाखांचे झाल्याने आठ कोटी ९९ लाखांचा तोटा एप्रिल महिन्यात एनएमएमटीला सहन करावा लागला आहे.
एनएमएमटीला नऊ कोटींचा तोटा, लॉकडाउनमुळे उत्पन्न ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 5:59 AM