कोविड रुग्णांच्या सेवेसाठी शहरात धावली एनएमएमटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 12:56 AM2021-04-04T00:56:53+5:302021-04-04T00:57:10+5:30
लूट थांबून सामान्यांना मिळाला न्याय
- योगेश पिंगळे
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यावर काही दिवसांत रुग्णांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले. रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने शहरातील महापालिका आणि खासगी रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हत्या. तसेच काही खासगी रुग्णवाहिका चालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारून सामान्य रुग्णांची लूट करत असल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त होत होत्या. त्यानंतर कोविड रुग्णांच्या सेवेसाठी महापालिकेने परिवहन उपक्रमाच्या एनएमएमटीच्या मिनी बसेस उपयोगात आणत नागरिकांची लूट थांबवली तसेच मोफत सेवा देऊन नागरिकांना मोठा दिलासा दिला.
नवी मुंबई शहरात १३ मार्च २०२० रोजी पहिला कोरोनाबाधित आढळून आला होता. त्यानंतर शहरात कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली होती. रुग्णांना उपचार देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध ठिकाणी कोविड सेंटर्स उभारण्यात येत होते. खासगी रुग्णालयांमधील बेड जवळपास फुल्ल झाले होते. रुग्णांचे प्रमाण वाढल्याने रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी शहरातील खासगी आणि महापालिकेच्या रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नव्हत्या. रुग्णांचा नाइलाज असल्याने अनेक खासगी रुग्णवाहिका चालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारून आर्थिक लूट करत होते. याबाबत महापालिकेकडे तक्रारी आल्यावर तसेच रुग्णवाहिका कमी पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नागरिकांना सुविधा देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेची रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्र, सिडको एक्सिबेशन सेंटर, कोविड सेंटर, पनवेलमधील इंडिया बुल्स, शहरातील सोसायट्यांमध्ये होणारे टेस्टिंग कॅम्प आदी ठिकाणी महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या मिनी एनएमएमटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना सुमारे ५८हून अधिक बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे इतर रुग्णवाहिकांवरील ताण कमी झाल्याने ज्या रुग्णांना रुग्णवाहिकेची गरज आहे त्या रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध होऊ लागल्या. खासगी रुग्णवाहिका चालकांनी मनमानी भाडे आकारून रुग्णांची लूट न करण्याच्या सूचना महापालिकेच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या.
नोव्हेंबर २०२० पासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यावर कोविड सेंटर्स बंद करण्यात आले होते तसेच ॲम्ब्युलन्स म्हणून वापरण्यात येणाऱ्या एनएमएमटी बसेसची संख्या कमी करण्यात आली होती. मात्र फेब्रुवारीपासून नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढू लागला असून, बंद केलेले कोविड सेंटर्स आवश्यकतेनुसार पुन्हा सुरू केले जात आहेत. तसेच कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये तसेच कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना घरी पोहोचविण्यासाठी एनएमएमटी बसेसमध्येदेखील आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येत आहे. सध्या शहरातील कोविड सेंटर, तपासणी केंद्रात एनएमएमटीच्या सुमारे २८ मिनी बसेस सेवा देत आहेत.
एनएमएमटी कर्मचाऱ्यांना कोविड ड्युटी
नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमातील ॲम्बुलन्स म्हणून सेवा देणाऱ्या बसवर दोन शिफ्टमध्ये एनएमएमटीचे चालक काम करत आहेत. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानात एनएनएमटीच्या वाहकांनीदेखील कामे केली असून, महापालिकेने तयार केलेल्या विशेष पथकांमध्येदेखील काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. एनएमएमटीच्या कॉम्पुटर ऑपरेटर कर्मचाऱ्यांना कोविड सेंटर, नागरी आरोग्य केंद्रांमध्ये कोविडसंदर्भात डाटा इंट्री, सुपरव्हिजन आदी कामे देण्यात आली आहेत.
कोविड काळात एनएमएमटीने ॲम्ब्युलन्स, बस चालक आणि इतर कर्मचारी उपलब्ध करून दिले. ज्या कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे ते कुठल्याही शंका उपस्थित न करता आपल्या जबाबदाऱ्या पार पडत आहेत. कोविड काळात सेवा देणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला, तरीदेखील एनएमएमटीचे कर्मचारी अविरतपणे सेवा देत आहेत.
- अभिजित बांगर,
(आयुक्त, न.मुं.म.पा.)